Tuesday, 16 January 2018

कृष्णाकाठचा वाघ

बापू बिरू वाटेगावकर


एका चित्रपटात दाखवतात तसं कथानक. कोणाला हि भूरळ पाडेल असं अगदी इतिहासात आपण एखाद्या शूरवीर नायकाबाबत वाचतो तसंच अगदी चरित्र आणि घटना घडल्या आणि महाराष्ट्राच्या मातीने दाखवून दिल कि तिची कूस किती उजवी आहे. 

एक बोरगाव नावाचं गाव होत. तिकडे एक गावगुंड " रंग्या शिंदे " नावाच्या माणसाची टोळी वावरत होती जिची दहशत पंचक्रोशीत होती. कोणाला म्हणून हा इसम अन्याय केल्याशिवाय सोडत नव्हता. गावातल्या स्त्री असो अथवा कोणाच्या कोंबड्या, बकऱ्या बळजबरीने घेऊन जाण असो , त्याला कोणाचीच भीती अथवा धाक राहिला नव्हता. गावाचे पुढारी सुद्धा " रंग्या शिंदेची " दहशत खाऊन होते. 

त्याच गावात बापूचा एका गरीब धनगर कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासून कुस्तीची आवड. पिढ्यानपिढ्या वाटेला आलेल्या धनगरी धंदा सांभाळत बापू मोठे होऊ लागले. आता बापुना हि " रंग्या शिंदे " ची झालं पोचू लागली. बापू उघड्या डोळ्यांनी " रंग्या " चा नंगानाच बघत होते. कोणत्या हि स्त्रियांची शिवरायणाच्या भूमीत छेड काढताना बघितली कि बापूच मानी " मराठा " रक्त पेटून उठत असे. अखेर गावातल्या पुढाऱ्यांनी बापुना साकडं घातलं कि " रंग्या " बाबत काहीतरी करा. आणि बापू आणि त्यांच्या सहकार्यांनी हा विडा उचलला. 

गावात ओव्यांचा कार्यक्रम ठेवला होता. अवघा गाव जमा झाला होता. बापू आणि त्याचे सहकारी तिकडे गुमान येऊन बसून राहिले. रंग्या हि तिकडे आलाच होता. कार्यक्रम रंगात सूर झाला. कीर्तनकार  एक एका ओवीचे विवेचन करत होते आणि अचानक सह्याद्री गडगडून उठवा तसा हा कृष्णाकाठचा वाघ उसळून उभा राहिला आणि क्षणात त्याने " रंग्याची " शीर धडावेगळं केलं आणि क्षणात काय झालं हे कोणाला कळायच्या आधीच बापू आणि त्याचे सर्व साथीदार त्या सह्याद्रीच्या घनदाट जंगलात गडप झाले. 

इकडे " रंग्या " चे कलेवर बघून त्याचा भाऊ रागाने लालबुंद झाला. त्याने रंग्याच्या रक्ताचा टिळा लावून " बापू " ना मारण्याची शपथ घेतली. तो येड्या सारखा बापूंचा शोध घेऊ लागला. बापूंनि अखेर ठरवलं कि त्यांना आता याच मार्गाने जायचं आहे. जो कोणी अक्षम माणसास अन्याय करेल त्याला मृत्यूदंडच मग त्या मार्गात कोणी येऊ अथवा केवढी हि किंमत चुकवावी लागो आपण ती द्यायची आणि बापूनी " रंग्या " च्या भावाला एकदिवस सरळ अंगावर चालून घेतला आणि त्याचा वध करून सुरु झाला " बापू बिरू वाटेगावकर " या नायकाचा एक प्रवास. 
  
सहयाद्री, न्यायासाठी लढणाऱ्या आपल्या बाळांना नेहमीच उराशी लपवून ठेवतो. शिवरायांपासून, रामोजी नाईक, भाई कोतवाल, वासुदेव फडके पर्यंत त्याने आपलं सर्वस्व वाहून दिल. अखेर हाच सह्याद्री धावून आला आणि त्याने भावूं एक नाही तर तब्बल २५ वर्ष लपवून ठेवलं.गरिबी आणि अडाणी पण न्याय आणि प्रामाणिकपणा शिकवतो. बापुना ज्यांनी मदत केले ते सर्वच गरीब आणि अडाणी होते. पैस्याच्या लोभापोटी त्यांनी कधीच बापूची दगाफटका केला नाही. एकदा तर उसाच्या मळ्यात जिथे बापू आणि त्याचे साथीदार लपले होते तिकडे पोलीस आले. पण त्या गुराख्याच्या मुलाने मुद्दाम चुकीची दिशा दाखवली पण बापूंचा मार्ग दाखवला नाही. 

का हि साधी भोळी माणसं उभी राहू लागली बापूंच्या मागे ? कारण तसेच होत. बापू कोणी खुनी अथवा दरोडेखोर नव्हते. बापू दिनदलितांचे कैवारी होते. अन्याला न्यायची ढाल होते. कोणाच्या सासरी अन्याय असो, दारू पीऊन छळ असो बापू कोणाच्या हि हाकेला धावून जात होते. बापूंच्या नुसत्या नावाने कित्येकांच्या अन्याला न्याय भेटलं. लोक पोलिसांकडे जाण्यापेक्षा बापूंकडे मदतीसाठी जाऊ लागले. 

बापूंचे नियम अत्यंत कडक आणि अढळ होते. स्वतःच्या रक्ताच्या पुत्राला सुद्धा त्यांनी " चूक " केली म्हणून " देहदंड " दिला. त्यावर बापूचा विचार खूप साधा होता कि ज्यांना बापूनी मारला ते सुद्धा कोणाचे तरी प्रियच होते ना मग माझ्या मुलाला का वेगळा न्याय. तो माझा जीव होता पण चूक हि चूक असते. " या त्यांच्या लढ्यात एक दोन नाही तर बापूंच्या हातून १२ वध झाले. 

अखेर सह्याद्रीचा हा वाघ पोलिसांच्या जाळ्यात सापडलाच. बापुना जन्मठेप झाली. बापू बाहेर आल्यावर अध्यात्माला लागले आणि त्यांनी प्रबोधनाला आपलं मार्ग बनवला आणि गावोगावी बापू प्रवचन करत लोकांना न्याय मार्गावर आणू लागले. अखेर सह्याद्रीच हे घोंगावत वादळ काल शांत झालं आणि मागे उरली ती असामान्य आयुष्याची एक कथा !

माझी माणसं परिवारातर्फे सह्याद्रीच्या या " मराठ्याला " मनाचा मुजरा 


दिनेश सावंत
माझी माणसं परिवार
https://www.facebook.com/mazimanasapariwar/




Thursday, 11 January 2018

कथा.. पानिपतच्या मराठा युद्धकैद्यांची!

२२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले.


पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वषेर्ं उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : ‘दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत र्अधकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते.’

पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. पश्चिम पंजाब (पाकिस्तान) ओलांडल्यानंतर बलुचिस्तान प्रांतातील डेरा बुगटी आदी भाग सुरू होतो. पानिपतच्या युद्धात बलुची सन्य अब्दालीच्या बाजूने लढले होते. पानिपत युद्धाच्या एक महिना अगोदर १५,००० बलुची घोडदळ अताईखान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला येऊन मिळाले. त्यामुळे अब्दालीची बाजू बळकट झाली होती. पानिपताच्या युद्धापूर्वी तीन वर्षे आधी १७५८ मध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक मीर नासीर खान नुरी (कलातचा खान) यांच्यामध्ये एक तह झालेला होता. या तहाच्या अटीनुसार मीर नासीर खान नुरीने अब्दालीला त्याच्या लष्करी कारवायांत सनिक पुरवायचे व त्या बदल्यात अब्दाली मीर नासीर खानाला सन्य ठेवण्यासाठी आíथक मदत करेल असे ठरले होते. अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानात परत आला त्यावेळेस कलातच्या खानाने अब्दालीकडे सन्य पुरविण्याच्या बदल्यात आíथक मोबदला मागितला. परंतु अब्दालीला हिन्दुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती. कारण दिल्लीचा बादशहा सततच्या आक्रमणांमुळे तसा कफल्लकच झालेला होता. आणि मराठय़ांकडूनदेखील युद्धात हत्ती, घोडे आणि तोफांव्यतिरिक्त काहीच आíथक घबाड पदरात पडले नव्हते. त्यामुळे अब्दालीने मराठा युद्धकैदीच पशांऐवजी मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केले. मराठा युद्धकैदी बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्धकैद्यांची त्यावेळची शारीरिक अवस्था हीदेखील असू शकते. युद्धकैदी जवळपास दोन-तीन महिने कैदेत होते आणि त्यांना अगदी तुटपुंज्या अन्नपाण्यावर दिवस काढावे लागले होते. अजून बोलन िखडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता. अगोदरच मानसिक व शारीरिकदृष्टय़ा खालावलेल्या मराठय़ांना या प्रदेशातून आणखी प्रवास जिवावर बेतला असता. त्यामुळेच अब्दालीने हा पुढचा विचार करून मराठय़ांना बलोच सरदारांना देऊन टाकले.

पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.

या युद्धकैद्यांपैकी बुगटी, र्मी, मझारी, रायसानी व गुरचानी इत्यादी बलोच जमातींमध्ये मराठा उपजमात आजही आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. पानिपत युद्धातील त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज आज धर्माने मुस्लीम झालेले आहेत खरे; परंतु त्यांना आपल्या मराठीपणाचा रास्त अभिमान आहे. या उपजमातींपकी फक्त बुगटी मराठय़ांविषयीची माहिती उपलब्ध आहे. बुगटी जमातीतील मराठय़ांचे तीन प्रमुख वर्ग पुढीलप्रमाणे-

बहुसंख्य मराठा युद्धकैदी हे काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून देण्यात आले आणि आज हा समाज त्या- त्या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो. उदा. काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा वगरे. आज हा वर्ग समस्त बुगटी मराठी लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के आहे. या वर्गाला गुलामगिरीत दिवस काढावे लागले. परंतु १९४४ मध्ये नबाब अकबर खान बुगटी (बुगटी जमातीचे मुख्य सरदार) यांनी मराठय़ांना या गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. १९४४ पर्यंत या मराठा वर्गाला प्रचंड शारीरिक कष्ट व हलाखीचे दिवस काढावे लागले. १९४४ पूर्वी त्यांची मुख्य कामे म्हणजे उंटांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, लोहारकाम व इतर छोटी-मोठी कामे करणे हेच असे. बुगटी मालक (आका) आणि त्यांचे मराठा गुलाम यांचे संबंध बऱ्यापकी जिव्हाळ्याचे होते. बुगटी मालक आपल्या कुटुंबाप्रमाणे मराठी गुलामांची देखभाल करीत असे. नियमाला ज्याप्रमाणे अपवाद असतो, त्याप्रमाणे काही बुगटी मालक क्रूरसुद्धा होते व ते मराठा गुलामांना अतिशय वाईट पद्धतीने वागवीत असत असे सांगितले जाते.

प्रत्येक बलुची जमातीमध्ये त्यांचे स्वत:चे असे कायदे  (जिर्गा) असतात. पूर्वी मराठय़ांना इतर बुगटी जमातींच्या तुलनेत असमान आणि जाचक असे कायदे लागू होते. उदाहरणार्थ, सियाकारी- म्हणजे Honour killing च्या कायद्यानुसार एखाद्या बुगटी व्यक्तीने दुसऱ्या बुगटी व्यक्तीचा वध केला तर वध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वध केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला मारण्याची मुभा होती. परंतु एखाद्या बुगटी व्यक्तीने मराठा व्यक्तीचा वध केला तर वधास वध हा कायदा त्यांच्या बाबतीत मात्र लागू नव्हता. अपराधी बुगटी व्यक्तीला माफक दंड करून सोडून देण्यात येत असे. याउलट, एखाद्या मराठा व्यक्तीने बुगटी व्यक्तीचा खून केला तर एका वधास दोन वध- असा विरोधाभासी कायदाही अस्तित्वात होता.

१९४४ साली हा मराठा समाज गुलामगिरीतून मुक्त झाला व जिर्गातले असमान कायदेही काळानुरूप रद्द करण्यात आले. गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही काही काळ या वर्गाने त्यांच्या बुगटी मालकांबरोबरच राहणे पसंत केले. कारण इतकी वष्रे गुलामगिरीत राहिल्यानंतर त्यांच्यात एक कमीपणाची भावना होती. अलीकडच्या काळात मात्र हळूहळू हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.

१९६० नंतर या समाजाने अन्य बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात बरीच आघाडी घेतली. कारण बाकीचा बुगटी समाज हा त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीतच अडकून पडलेला होता. त्यामुळे सरकारी नोकऱ्या तसेच ‘सुई पेट्रोलियम कंपनी’त बहुसंख्येने या मराठा समाजाने आपले बस्तान बसविले. बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर १९५० च्या दशकात सुई पेट्रोलियम कंपनी सुई येथे सुरू करण्यात आली. सुरुवातीला कामगार, फोरमन म्हणून मराठा समाजाला तिथे कामे मिळाली आणि हळूहळू त्यांच्यापकी काहीजण मॅनेजर, सुपरवायझर अशा पदांवरदेखील पोहोचले. आज हा मराठा समाज काळाशी जमवून घेत स्वत:च्या कर्तृत्वावर प्रगती करतो आहे व सुखात नांदतो आहे, ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.

दुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज (शाहू मराठा). मराठा युद्धकैद्यांपकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता. बुगटी प्रांत हा बराचसा कोरडा व वाळवंटी आहे. तेथे शेती केली जात नव्हती. बलुची टोळ्या या भटक्या होत्या आणि शेती करण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते. मॅरो तसेच सिआहफ या डेरा बुगटीजवळील काही भागात पाणी उपलब्ध होते. मराठा युद्धकैद्यांपकी ज्यांना शेतीचे चांगले ज्ञान होते अशांना बुगटी सरदाराने या भागात शेती करण्यासाठी अनुमती दिली; जेणेकरून बुगटी लोकांसाठी अन्नधान्याची तरतूद होईल. साहू मराठय़ांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला व अतिशय उत्तम प्रकारे शेती केली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गहू व बाजरी यासारखी धान्ये ते पिकवीत असत.

इतर बुगटी जमाती या त्यांच्या मूळ सरदारांच्या नावाने परिचित आहेत. उदा. रहेजा बुगटी जमातीचे ‘रहेजा’ हे नाव त्यांच्या रहेजा या पूर्वज सरदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच या वर्गाने आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘शाहू’ हे नाव छत्रपती शाहूंच्या नावावरून धारण केले. शाहू मराठय़ांच्या गढवानी, रंगवानी, पेशवानी, किलवानी वगरे सात उपशाखा आहेत. या शाखा कशा तयार झाल्या, याबद्दलची माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. परंतु ‘पेशवानी’ हे नाव पेशव्यांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे.

शाहू मराठे जरी धर्माने मुस्लीम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे, घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे, इ. पद्धती महाराष्ट्रात जरी आज लुप्त होत आल्या असल्या (केवळ काही ग्रामीण भागातच टिकून असल्या) तरी साहू मराठय़ांमध्ये अजूनही त्या प्रचलित आहेत. त्यांच्यामुळे काही मराठी शब्दही बलुची भाषेत आलेले आहेत. उदा.‘आई’ हा शब्द साहू मराठय़ांमध्ये आईला संबोधित करायला अजूनही वापरला जातो. मूळच्या बुगटी समाजानेही हा शब्द स्वीकारला आहे. स्त्रियांची काही मराठी नावे- कमोल (कमळ), गोदी (‘गोदावरी’चे संक्षिप्त रूप), गौरी, सबुला (सुभद्रा) अजूनही त्यांच्यात वापरली जातात. विनोदाची गोष्ट म्हणजे जसे मराठीत सुनीलचे ‘सुन्या’ असे टोपणनाव होते तसेच अजूनही साहू मराठय़ांमध्ये टोपणनाव ठेवले जाते. उदा. कासीम या नावाचे टोपणनाव ‘कासू’ असे केले जाते.

तिसरे- दरुरग मराठा! बुगटी मराठय़ांच्या तीन वर्गापकी हा वर्ग संख्येने सर्वात कमी आहे. हा वर्ग सुरुवातीपासून बुगटी सरदारांशी संबंधित होता व त्यामुळे त्यांना मोठा मान मिळत असे. आज या वर्गातले काही लोक मोठे जमीनदार आहेत. या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाइलवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो.

या तिन्ही वर्गातील मराठी बांधवांनी इतर बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात लवकर प्रगती केली. आज या समाजातील लोक इंजिनीअर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रोफेसर व उच्चपदस्थ राजकारणी आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही इतर बुगटी समाजापेक्षा चांगली आहे. १९९५ साली अकबर एस. अहमद (पाकिस्तानी राजनतिक अधिकारी व समाजशास्त्रज्ञ) यांनी लिहिलेल्या एका संशोधनपर निबंधातही या मराठा समाजाचा त्यांच्या पूर्वीच्या बुगटी मालकांपेक्षा अधिक उत्कर्ष झाल्यामुळे एकुणात बुगटी समाजात झालेल्या सामाजिक उलथापालथीची नोंद घेण्यात आली आहे.

सध्या डेरा बुगटी गावातील २०,००० लोकसंख्येपकी ३० टक्के म्हणजे ७००० लोक मराठा आहेत. तर सुई शहराच्या ८०,००० लोकसंख्येपकी दहा टक्के लोकसंख्या- म्हणजे ८००० लोक मराठा आहेत. सुई म्युनिसिपल कौन्सिलचे व्हाइस चेअरमन व डेरा बुगटी म्युनिसिपल कौन्सिलचे विरोधी पक्षनेते व १४ सदस्यांपकी सातजण हे मराठा सदस्य आहेत. इतर बुगटी जमातींप्रमाणे मराठा समाजाचा जिर्गादेखील आहे.

१९६० च्या दशकात सिल्विया मॅथेसन या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या ‘टायगर्स ऑफ बलुचिस्तान’ या पुस्तकात बुगटी मराठा समाजाचे उल्लेख आढळतात. लेखिकेचे पती सुई पेट्रोलियम कंपनीत नोकरीला होते. लेखिकेने बुगटी मराठा समाजजीवनाचे वास्तवदर्शी वर्णन या पुस्तकात केले आहे. मट्रा (‘मराठा’ शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश) लोक रंगाने काळेसावळे, लहान उंचीचे आहेत आणि इतर बुगटी समाजापेक्षा वांशिकदृष्टय़ा भिन्न आहेत. या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, या मराठा लोकांना १५ व्या शतकात हुमायून बादशहाला जेव्हा मीर चाकूर खान (बुगटी सरदार) याने दिल्लीजवळील युद्धात मदत केली त्यावेळेस बंदी बनवून गुलाम म्हणून येथे आणण्यात आले. परंतु हे साफ चुकीचे वाटते. कारण १५ व्या शतकात मराठा सन्य उत्तरेत गेले होते याबद्दलचे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त या पुस्तकात मराठा व पठाण गटांमध्ये झालेल्या दंगलीचे, तसेच दोन मराठा पोस्टमन रोज रात्री सुई ते डेरा बुगर्ट व पुन्हा परत असे ६० कि. मी. अंतर पायी कसे चालत जात, आणि एका मराठा गुलाम व्यक्तीने एका अवघड कडय़ावर चढून जाऊन आपल्या मालकाबरोबर लावलेली पज कशी जिंकली आणि त्या बदल्यात स्वत:ची गुलामगिरीतून कशी सुटका करून घेतली, याचे वर्णन केलेले आहे.

१९९० च्या दशकात जेव्हा िहदी चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी नव्हती, त्यावेळेस डेरा बुगटी येथे ‘तिरंगा’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात लागला होता. त्यात नाना पाटेकरांनी एका मराठी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात जेव्हा नाना पाटेकर ‘मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं’ हा संवाद म्हणतात, त्यावेळी चित्रपटगृहातील या मराठा प्रेक्षकांनी हर्षांने शिट्टय़ा वाजवत एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येते. बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी ‘द ग्रेट मराठा’ ही िहदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली.

बलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे प्रसिद्ध िहदी गीत ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत. सब्ज अली बुगटींचे मूळ बलुची गाणे यू-टय़ूबवर ऐकता येऊ शकते. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे ‘लवानी लला’ हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा या बलुची वाद्यावर बऱ्याच मराठा कलाकारांची चांगलीच हुकूमत आहे.
मात्र आज बुगटी मराठा समाज बुगटी जमातीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे त्यांना मराठी भाषा, त्यांच्या पूर्वजांची नावे आणि इथल्या मूळ गावाचे नाव याबद्दल काहीच ज्ञात नाही.
एकंदरीने पानिपतावरील युद्धात झालेली हानी ही आपण समजतो त्यापेक्षा निश्चितच खूप अधिक होती. बहुसंख्य मराठा युद्धकैदी आणि त्यांच्या वंशजांना १८५ वष्रे त्यामुळे गुलामगिरीत दिवस काढावे लागले. आजवरच्या त्यांच्या पिढय़ांतील मराठय़ांची संख्या ही पानिपतात शहीद झालेल्या मराठा सनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल.
बुगटी समाजाव्यतिरिक्त इतर बलुची समाजातल्या (र्मी, रायसानी वगरे) मराठा समाजाची आज काय स्थिती आहे, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. बलुचिस्तानात उन्हाळ्यात पारा ५०० से. च्या वर जातो. धुळीची मोठी वादळेही वारंवार होत असतात. अशा खडतर प्रदेशामध्ये टिकून राहून आपल्या पुढच्या पिढय़ांची उत्तम काळजी घेणाऱ्या आणि अद्यापही आपल्या मराठीपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या या सहय़ाद्रीच्या कणखर मराठी समाजाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आजची बुगटी मराठय़ांची पिढी सुखात आहे. भारतातील मराठी समाजाने त्यांची दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
सध्या बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानी लष्कराच्या अमलाखाली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधही सध्या तितकेसे चांगले नाहीत. त्यामुळे बुगटी मराठा समाजाशी संबंध प्रस्तापित करणे तितकेसे सोपे नाही. भारतातील मराठी समाज या बुगटी बांधवांचे निश्चितच देणे लागतो यात दुमत नाही. जरी हा समाज स्वत:ला ‘मराठा’ म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील केवळ ‘मराठा’ या जातीशी संबंधित नाही. कारण पानिपतात अठरापगड जातीचे सनिक व सरदार लढले होते. मराठीजन व महाराष्ट्र सरकार यांना या समाजाबद्दल माहिती मिळावी, या हेतूने केलेला हा लेखप्रपंच. भविष्यात आपल्यापासून दुरावलेल्या या मराठीजनांसाठी आपल्याला थोडेबहुत काहीतरी करण्याची इच्छा व्हावी, हीच त्यामागची अपेक्षा.
आनंद शिंदे
लोकसत्ता संग्रहित लेख 

Monday, 1 January 2018

हळदीची लढाई . . . . . . बोस ते बासमती

रसायनशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर
पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते मराठी वैज्ञानिक { जन्मदिवस इंग्रजी दिनांक १ जानेवारी ख्रिस्ती वर्ष १९४३ }

जीवनाची बारा वर्ष अनवाणी चालून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रघुनाथ माशेलकरांनी माशेल ते मुंबई ते युरोप पर्यंत जाऊन त्यांनी आपले पदवी पुढील { पोस्ट डॉक्टरेट } शिक्षण पूर्ण केलं आणि इंग्लंड मध्ये ज्या पुस्तकात न्यूटन ने स्वाक्षरी केली त्या पुस्तकात स्वतः स्वाक्षरी करून महाराष्ट्राच्या या सुपुत्राने मराठी झेंडा अटकेपार रोवला.
त्यांची जगप्रसिद्ध " हळदी लढाई " आजही तेवढीच इतिहासात अजरामर आहे जेवढी तानाजी आणि बाजींची आहे. अमेरिकेने हळदीच्या संशोधनावर स्वतः एकेरी अबाधित हक्क जाहीर केल्यावर स्वाभिमानी माशेलकर यांनी आंतराष्ट्रीय न्यायालयात हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही अमेरिकेविरुद्ध कडवी झुंज दिली आणि अखेर अमेरिके सारख्या बलाढ्य राष्ट्राला मराठी पाणी पाजून भारताचे ज्ञान जगभर नेले. तसाच लढा त्यांनी बासमती तांदळासाठी सुद्धा दिला.
" बोस ते बासमती " हि त्यांची आख्यायिका आजच्या तरुणाईला आश्चर्य करणारी आहे. वायरलेस सवांद साधण्याचे तंत्रज्ञान जगदीशचंद्र बोस यांनी केला पण त्याचे पेटंट घेतले नाही. परंतु त्यानंतर अनेक काळाने शोध केलेल्या मार्कोनीने त्याचे पेटंट घेऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. १८९८ मध्ये बोसांनी लावलेल्या संशोधनाचे बरोबर १०० वर्षांनी १९९८ मध्ये माशेलकरांनी प्रदीर्घ लढण्यानानंतर हक्क मिळवले.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) चे अध्यक्ष असल्यापासून ओषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तेवढ्याच जोमाने काम करत आहेत.
रघुनाथ माशेलकर,वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ चे प्रमुख झाले आणि प्रमुखपदाची सूत्रं हातात घेतली, तेव्हाही त्यांच्या मनात त्यांच्या शिक्षकांनी सांगितलेली भिंगाची घटना घुटमळत होती. त्या वेळी सी. एस. आय. आर. मध्ये २८,००० लोक कार्यरत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी " व्हिजन "नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचं समातंर चालणं थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ठ पद्धतीने बांधलं आणि मग त्यातून निर्माण झालं, भारतीय वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व!
अश्या या मराठी भारतीयांस माझी माणसांचा मानाचा मुजरा
भाषांतरित लेख { मूळ संधर्ब् }
मराठीमाती.कॉम

Sunday, 24 July 2016

उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – कुरवंडे – चावणी – उबरखिंड – खोपोली)



उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – उंबरखिंड – खोपोली)  


कोणत्याही नवीन मोहिमेची सुरवात हि अभ्यास मोहिमेतून करणे अनिवार्य असते . याच अनुषगाने उबरखिंड मोहीम साक्षात शिवराय ज्या मार्गांनी उबरखिंडीत दाखल झाले त्याच वाटेने करण्याचे योजले होते . त्यासाठी लोणावळा – कुरवंडे – चावणी – उबरखिंड – खोपोली ह्या मार्गाने मोहीम सुरु केली.  ठरल्याप्रमाणे दिनेश सावंत , अचल राणे , संतोष शेळके , विनोद भोसले , आणि योगेश वाळूंज असे आम्ही पाच जण या अभ्यास मोहिमे साठी प्रथमता जाणार होतो . त्यासाठी दिवस निवडला तो रविवार २४ जुलै २०१६. त्यासाठी आम्ही   शनिवार , २३ जुलै २०१६ रोजी सी.ए.टी  ते  पंढरपूर या पेसेंजर गाडीने लोणावळा पर्यंत चा प्रवास करणार होतो. सर्व नियोजन झाले होते, बैठक पार पडली होती . परतू संध्याकाळी त्यात अचानकपणे काही कारणाने ठरलेल्या मोहीम कार्यक्रमात बदल करून आम्ही सर्व रविवारच्या सकाळी ६:३३ च्या इंद्रायणी एस्प्रेस ने निघणार होतो.
               विनोद , संतोष , आणि मी (योगेश) आम्ही तिघेही अगदी वेळेवर ठरलेली गाडी पकडली. परंतु उर्वरित आमचे सख्खे दोन 
आधारस्तंभ म्हणजे दिनेश सावंत आणि आमच्या नेहमीच्या मोहिमेचे सरसेनापती अचल राणे यांचा काहीच पत्ता लागत नव्हता.
 दोघांना फोन करून करून आमच्या मोबाईल ची बॅटरी मात्र उतरली . पण एकाने मोबाईल बंद तर दुसर्याने तो बहुधा शांत मोड वर 
टाकून ठेवलेला असावा . असो ...  
आम्ही सारे एकमेकांचे सख्खे मित्रच , आमच्या तिघांचा हि मूड अचानक पणे आलेल्या या प्रसंगाने जाम उतरला होता. इंद्रायणी गाडी सोडून दिली . परतू काही केल्या या दोघांशी तिळमात्र हि संपर्क काही होऊ शकला नाही. आता करायचे काय? 
असा यक्ष प्रश्न आम्हां तिघांपुढे होता. सर्व नियोजित मोहिमेचा पुरता बोजबारा उडाला होता. आम्ही सर्वांचे आगाऊ तिकीट काढून ठेवले होते ते सुद्धा व्यर्थ गेले .काहीश्या गोंधळलेल्या आणि अचानक उद्भवलेल्या या 
परिस्थितीतून स्वतःला सावरत आम्ही कल्याण स्थानकात थोडी न्याहारी केली , आणि ओळखीच्या चेहऱ्यानसोबत थोड्या हसण्याचे
 क्षण अनुभवले . आमच्यातल्या विनोद ने मात्र आमच्या होणाऱ्या वाहिनीशी मनमोकळ्या गप्पा मात्र मारून घेतल्या. फसलेल्या नियोजनाचे अपडेट
सर्वांआधी “सबसे तेज” आमच्या वाहिनीन पर्यत पोहचत होते.   या सर्वातून उरलेले आम्ही दोघे २ तास मात्र ताटकळत राहिलो... 
असो!
पुढे काय करायचे ? कारण मिळणारी एक छानशी सुट्टी ची पुरती वाट लागलेली होतीच. अश्याच परिस्थितीत कार्ल्याच्या एकविरा 
आई , किवा भिवपुरी ला जाण्याच्या आम्ही विचार करू लागलो. सर्व काही ऑफ शेडूल होणार होते. असाच विचार करत करत 
आम्ही गर्दीने भरलेली आणि विकेंड ची मज्जा अनुभवण्यासाठी वा फिरण्यासाठी निघालेल्या मुंबई करांच्यासमवेत आम्ही हि 
कर्जत लोकल पकडली . त्याच गर्दीच्या लोकल मध्ये “दि शो मस्ट गो ओंन” या वाक्याला स्मरून उंबरखिंड ची ठरलेली मोहीमच 
“ऑफ शेडूल” करायची हे नक्की केले. कर्जत स्थानकातून आम्ही पुढे ९ वा. २०मि. ची इंदोर- पुणे या पूर्ण विनागर्दीच्या
गाडीने प्रवास करून लोणावळा स्थानकात १०वा. ११मि. दाखल झालो.  
 
      
लोणावळा स्थानकामधून बाहेर पडल्यानंतर बाहेर रिक्षा करून १५० रु . एवढा खर्च करून तिघांना कुरवंडे गावात जाता येते. चालत जायचे
असेल तर किमान ४५ मिनिटे ते १ तास लागतो. आम्हांला आधीच २ तास उशीर झाल्यामुळे १०वा. ४०मि. नी रिक्षाने प्रवास चालू केला.
रिक्षाने कुरवंडे गावात पोहचलो. तिथे थोडी चौकशी करून आम्ही कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागच्या बाजूने 
नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात केली.






 सर्वजण चालण्याच्या उत्साहात होते. उजवीकडे चढत जाणारी वाट साधारण २० मिनिटे चाललो काही अंतर चालत गेल्यावर आम्हांला 
INS SHIVAJI च्या लांबलचक कुंपण दिसले. थोड्या पुढे गेल्यावर जेथे नागफणी चा डोंगर आहे. एकाशेजारी एक असणारे 
तीन फलक  पाहिले.  


इथून उजवीकडे वर जाणारा रस्ता नागफणीला जातो तर डावीकडे उतरणारा कच्चा रस्त्याने अम्बा नदीच्या काठी
 असलेल्या चावणी गावात जाता येते.  
 आम्ही चालण्यास सुरवात केली . खूप सारी नोंद घेत घेत ,छायाचित्रे काढत काढत आमची मोहीम पुढे सरकत होती. झरा लागल्यानंतर
 मात्र एक वाट सरळ जात होती तर एक वाट उजवीकडेवळत होती. थोडा विचार करून आम्ही  उजवीकडच्या वाटेवर शिक्कामोर्तब केले. 
सर्वांनी उजवीकडे मोर्चा वळवला. तेथून लांबवर दरीत अम्बा नदीचे पात्र दिसू लागले .



एका ठिकाणी थांबून आमच्या सोबत आणलेल्या न्याहारी चा मोकळ्या रान परिसरात आम्ही आस्वाद घेतला. खडकातून वाहणाऱ्या डोंगराळ पावसाच्या पाण्याने आमची तहान भागवत तृप्त होऊन आम्ही पुढे चालत होतो.  सोबत संतोष ने आणलेल्या वाळवलेल्या आंब्याच्या कोयींचे, जांभळाच्या बियांचे रोपण “योग्य ठिकाणी” करत होतो.









मजल दरमजल करत आणि सेल्फिं घेण्याचा  मर्यादित आनंद घेत आम्ही खाली उतरत होतो. साधारणता २:०० ते २:३० तासाचे अंतर आम्ही चालुन पायथ्याशी असलेल्या चावणी गावात पोहचलो. गाव तसे अगदी साधारण आहे . किमान २०० घरांची वस्ती असलेला ते एक छोटेसे गाव होते. त्या गावातून काही कच्चा आणि मग डांबरी रस्त्यातून चालत आम्ही “उंबरखिंडीत” दाखल झालो.












































समरभूमीत आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महाराजांच्या पराक्रमाला स्मरून तिथे उभारलेल्या स्मारकाला वंदन करून आम्ही दुपारचे जेवण घेतले. थोडा वेळ पोहण्याचा आनंद आम्ही त्या ओढ्या च्या ठिकाणी घेतला. वेळेचा भान ठेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. उबरखिंड ते पाली-खोपोली रोड असे ४ किलोमीटर अंतर आम्ही पायी कापले. रोडवर आल्यावर ट्रक ने आम्ही काही अंतरावरील मुख्य चौकात उतरलो तेथून पाठून आलेल्या पाली-खोपोली एस.टी.  गाडीने आम्ही खोपोली गाठले .
मोहीम करताना सर्वांचा विचार, तसेच योग्य निर्णय घेण्याची असलेली नितांत गरज आणि आमच्यातील मोहीम सुरु असतानाची अबाधित एकत्र विचार शक्ती शेवटपर्यंत कायम ठेवायची असते. तिला कोणत्याही परिस्थितीत फाटे फुटू देता कामा नये. याची जाणीव करून देत , काहीश्या काळजीने आमची हि ऑफ शेडूल मोहीम मजेशीररित्या यशस्वीपणे संपन्न जाहली!  
  

मोहीम सूत्र - 

१. लोणावळा स्टेशन परिसरापासून मोहीम सुरवात  

२.  लोणावळा ते कुरवंडे गावापर्यंत प्रवासाचे नियोजन करावे .

. कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठच्या बाजूपासून नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात करावी.  

. च्या कुंपणाच्या बाजूने सरळ चालत जावे. 

. चावणी गावाच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात करावी. 

. चावणी गावातून पुढे उंबरखिंडित जाता येते. 

. परतीच्या प्रवासाच्या वेळी ४ किलोमीटर अंतर चालत पार करून शेमडी गावच्या ठिकाणी, पाली – खोपोली रोड पर्यत पोहोचणे.
८. तेथून एस. टी . बस ने किवां खाजगी वाहनाने खोपोली ला जाता येते . 



Sunday, 8 March 2015

शिवजन्म उत्सव ( शिव जयंती )

शिवजन्म ( साभार चंद्रशेखर पिलाने )
“राजा श्रीशिवछत्रपति” बोलताच एक उज्वल भविष्य मांडणारे हिंदूस्थान कर्तुत्ववान व्यक्तिमत्व, प्रचंड इच्छा शक्ति अन आपल्या मावळ्यांवर बंधू सारखे प्रेम करणारे “राजा श्रीशिवछत्रपति शिवराय”..........
अखंड हिंदूस्थान मध्ये १४६० च्या काळात हिंदूंवर होणारा अत्याचारामध्ये निजामशाही, मुघलशाही, कुत्बशाही, इमादशाही आणि बरीदशाही यांनी तर समस्त हिंदूंची इच्छापूर्ती संपुष्ठात आणली. श्री भगवान श्री कृष्णांनी सांगितलेले उद्गार
“जेव्हा जेव्हा या पवित्र पावन धर्तीवर अत्याचार, व्यभिचार, मानव अहितकार अश्या अनेक संकटाना व्याधीतून मुक्त करण्यासाठी एक परमात्मा या भूमीवर जन्म घेईल” आणि तो दिवस उजाडला १५५१ शुक्ल संवत्सर फाल्गुन शुद्ध तृतीया “राजा शिवछत्रपति” यांनी मातोश्री “जिजाऊसाहेब” यां स्वातंत्र्यदेवीच्या उदरात जन्म घेतला.लहानपणा पासून हिंदू धर्माची शिकवण शिवछत्रपतिंना जिजाऊसाहेब यांनी महाभारत, पुराण व इतर पवित्र ग्रंथ हि सारी शिवछत्रपतिंची अध्ययन केंद्र होती. भगवान श्री कृष्ण यांच्या राजनीतीचे रुपांतर शिवनीती मध्ये कसे मांडावे याचे शिकवण सुद्धा जिजाऊसाहेबां बरोबर श्रीमंत श्री शहाजी राजे यांनी सुद्धा दिली. पण जस जसा शिवकाळ व शंभूकाळ संपत आला आणि अखंड हिंदूस्थानाला उतरती कळा लागू लागली.....
ती म्हणजे पोर्तुगीज व इंग्रज ......
इंग्रज आले व्यापार केला व लालसे पोटी सत्ता उपभोगास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी संपूर्ण हिंदूस्थान पादांक्रांत करून आपली संस्कृती हिंदूस्थानच्या माथ्यावर मारण्याची सुरुवात केली आणि आपण मात्र ती उदार मनाने स्वीकारली. संपूर्ण हिंदूस्थानात सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक कारभार हा इंग्रजी कालगणनेनुसार चालतो. या हिंदूस्थानातील दिनदर्शिका हि इंग्रजी कालगणनेनुसार तयार केल्या जातात. श्रीशिवछत्रपतिंची जयंती हि इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी आली होती. सरकार व संबंधीत निरनिराळ्या अनुशासनालयें यांच्यात एक वाक्यता राखण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी श्रीशिवछत्रपतिंची जयंती उत्सव साजरा केला जातो. आणि तो शासकीय संमत सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. पण त्या इंग्रजी कालगणनेत सुद्धा किती एक सूत्रता आहे का ? याचा विचार आपण कधी केला आहे का ? तो सुद्धा श्रीशिवछत्रपतिंच्या जयंती बद्दल यावर एकचं उत्तर नाही ......
इंग्रजी कालगणना आणि त्यामधील त्रुटींमुळे इसवी सन १५८२ साली पोप ग्रेगरी यांनी बाद केले व ४ ऑक्टोबर १५८२ नंतर पुढील दिवस १५ ऑक्टोबर १५८२ आहे असे समजावे असा फतवा काढला. अर्थात त्यातील त्यांनी त्या वर्षातील १० दिवस बाद केले. युरोपातील कॅथॉलिक देशांनी ताबडतोब नव्या ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. परंतू जगभर साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या प्रोटेस्टंट ब्रिटनने मात्र २ सप्टेंबर १७५२ पर्यंत ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला नाही. ब्रिटनच्या साम्राज्यात ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणना चालू राहिली. अर्थातच भारतातही सारा इतिहास हा ज्युलियन दिनांकात रुपांतर करण्यात आले. १७५२ साली २ सप्टेंबरच्या पुढील दिवस १४ सप्टेंबर असेल, असे घोषित ब्रिटनने ग्रेग्रोरियन कॅलेंडरशी जुळवून घेतले.(१)
अर्थातचं मग आपणचं का ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणनचे स्वीकार करून आपल्या हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा का देतो ??????
आता आपण तिथी संस्कृती पाहू....... आपणांस माहितचं असेल कि इंग्रजी वर्ष म्हणजे “इ.स.” आणि भारतीय वर्ष शके (संवत्सर) यांच्यामध्ये ७८ वर्षांचा फरक आहे. ७८ वर्षे मिळवली तर इंग्रजी कालगणने नुसार आपल्याला इसवी सन मिळते ते उदा. ( शके (संवत्सर) १५५१+७८ = (इसवी सन) १६२९ ) आपणांस हि संख्या मिळते आणि इतर सर्व शिवकालीन इतिहासकारांनी अशी पद्धत स्वीकारलेली आहे हे आपणांस माहितचं असेल.....
आता आपण शिवकालीन इतिहास संकलक श्री. आप्पा परब यांनी मिळवलेली माहिती पाहू....
१) राजाभिषेक शकावली १६७४
२) शिवापूरवही शकावली १६७४
३) दासपंचायन शकावली १६९६
४) * जेधे शकावली १६९७ (अत्यंत महत्वपूर्ण माहिती)
या चार शकावली शिवजन्मतिथी नोंदताना “ शके (संवत्सर) १५५१“ ची नोंद करण्यास विसरत नाही. त्यातही जेधे शकावली विस्तृतपणे सांगते कि, शुक्ल संवत्सरे शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीय, शुक्रवार, हस्त नक्षत्र, घटी १८, पळे ३१, गड ५, पळे ७ ये दिवसीं राजश्री शिवाजीराजे शिवनेरीस उपजले. (२)
त्याच सोबत कविश्वर परमानंदांनी पोलादपूर येथे “शिवभारत” या काव्यग्रंथात ६ व्या अध्यायांत २६, २७ व २८ श्लोकांत श्रीनृप शालिवाहन शके १५५१, शुक्लनाम संवत्सर, उत्तरायण, शिशिरऋतू मध्ये फाल्गुन वद्य तृतीय जन्म झाला अशी नोंद केलेली आहे. (३)
हिंदूस्थानातील दक्षिणेतील कर्नाटक मधील बृहदेश्वरमंदिर शिळालेख, उत्तरेतील राजस्थानातील शिवजन्मपत्रिका, पूर्वेकडील कारी (?) येथील शकावली, हिंदूस्थानातील पश्चिमेकडील शिवभारत काव्यग्रंथ या चारही संदर्भातून आई जिजाऊ यांच्या पोटी षष्ठम पुत्रजन्माचे लिखित प्रमाण मिळते. श्रीसातवाहन शके १५५१, शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्य तृतीय शुक्रवार ये दिवशी राजश्री शिवाजीराजे किल्ले शिवनेरीवर उपजले. (४)
श्रीनृप शालिवाहन १५५१, शुक्लनाम संवत्सर, उत्तरायण, फाल्गुन वद्य तृतीय, शिशिर ऋतू, सूर्यास्तानंतर जिजाबाई साहेब यांचे उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला. त्या दिवशी इंग्रजी दिनांक होता १ मार्च १६३० (ज्युलियन दिनांक १९ फेब्रुवारी). (५)
भारतीय तीथ - फाल्गुन वद्य तृतीय, शुक्लनाम संवत्सर १५५१, जन्म स्थान : शिवनेरी, जन्म वेळ : सायंकाळी ७ वाजता, उदित रास : सिंह (६)
इसवी सन पूर्वी सातवाहनांनी आपले साम्राज्य या दंडकारण्यात निर्माण केले. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण या अतिप्राचीन शहराची कीर्ती दूरदूर पर्यंत दिगंत पसरवली. सातवाहनांपासून पुढे तेराव्या शतकापर्यंत महान अश्या राष्ट्राची संस्कृती चहू बाजूंनी बहरवली आणि फुलवली सुद्धा हे मोठे अग्रस्थानी मांडिले पाहिजे.
सातवाहनानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, कलचुरी, शिलाहार व यादव अश्या राजकुळांनी महाराष्ट्राला प्रगती पथावर अग्रेसर केले. आज आपण त्याचं हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा देत आहोत हे सत्य आहे कि नाही. ??? आपण इंग्रजी कालगणना फक्त सरकारी व इतर आर्थिक व्यवहारात योजिले तर काही गैर नाही परंतु आपल्या पुढील पिढीला मात्र हिंदूस्थानातील तिथी संस्कृती विषयी तरी योग्य ते मार्गदर्शन केलेचं पाहिजे.
हीच एक विनंती .....
|| जय भवानी – जय जिजाऊ ||
|| जय श्री शिवछत्रपतिं ||
- संदर्भ
अ) शिवजन्म : (२), (३) पृष्ठ क्रमांक. ९ व १०, (४) पृष्ठ क्रमांक. ५ (शिवकालीन इतिहास संकलक श्री.आप्पा परब)
ब) खगोलीय शिवकाल (१) पृष्ठ क्रमांक. ५, (५),(६) पृष्ठ क्रमांक. ९ व १० (मोहन आपटे, पराग महाजनी)
( छायाचित्र साभार : महाजाल )
—© वरील सर्व हक्क संदर्भ लेखकांकडे आहेत.

Thursday, 5 March 2015

आद्य ग्रंथ

आद्य ग्रंथ
मराठी साहित्याचा आरंभ
इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत मराठी भाषेची चिन्हे शोधत जाता येते. या आधीच्या काळातही तिचे अस्तित्व असावे याचेही काही उल्लेख आढळतात. मात्र, ‘लीळाचरित्र’ अथवा ‘ज्ञानदेवी’च्या आधीचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आद्य मराठी ग्रंथ कोणता हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ हा आद्यग्रंथ असे समजले जात होते. परंतु साहित्यसंशोधकांच्या मते तो इ.स. ११८८ च्या बराच अलिकडचा, म्हणजे ‘ज्ञानदेवी’ नंतरचा (इ.स. १२९०) असावा. इ.स. १२७८ च्या सुमारास रचला गेलेला ‘लीळाचरित्र’ हाच आद्यग्रंथ ठरतो असे अभ्यासकांचे मत आहे.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘श्रीपतिकृत मराठी ज्योतिषरत्नमाला शक ९६१ सुमार’ या लेखात श्रीपतिगृह विरचित ज्योतिषरत्नमाला या संस्कृत ग्रंथाची त्याने स्वतःच केलेली टीका हा मराठीतील पहिला उपलब्ध ग्रंथ होय असे म्हटले आहे. मराठी वाङ्मयकोशात (खंड पहिला, संपादक श्री. गं. दे. खानोलकर) म्हटले आहे. ‘श्रीपतींची मराठी टीका गद्यात असून ती त्यांनी इ.स. १०५० मध्ये लिहिली. हा टीकाग्रंथ मराठीतील प्राचीनांत प्राचीन असा पहिलाच (उपलब्ध) गद्य ग्रंथ आहे असे आज तरी मानावयास हरकत नसावी.’ प्रा. श्री. रं. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. ‘शक ९६१ च्या पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आणि ज्योतिषरत्नमालेचा (मराठी टीकेसह) काल याच सुमाराचा असल्याने श्रीपतिभट्ट, विरचित ज्योतिषरत्नमालेवरील टीका हा मराठी भाषेतला आद्यग्रंथ ठरतो.’(राजवाडे समग्र साहित्, खंड दुसरा, प्रस्तावना)
ज्योतिषरत्नमाला, विवेकसिंधु, लीळाचरित्र, ज्ञानदेवी या आरंभीच्या उपलब्ध ग्रंथांखेरीज मराठीत लिहिले गेलेले साहित्य असले पाहिजे. ग्रंथलेखनासाठी आज जशी सामग्री उपलब्ध आहे तशी प्राचीन काळी नव्हती. कागदावर लिहिलेले उपलब्ध असे प्राचीनतम हस्तलिखित म्हणजे विठ्ठल गलंडकृत ‘रसकीमोदी’ची इ.स. १५३४ मध्ये लिहिली गेलेली प्रत हे होय. त्र्यं.शं. शेजवलकर यांच्या मते पंधराव्या शतकापर्यत कागदाचा प्रसार महाराष्ट्रात नव्हता. ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात बहामनी राजवटीत दौलताबाद, जुन्नर वगैरे ठिकाणी कागदाचे कारखाने निघू लागलेले असावेत. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांच्या पश्चिम किनाऱ्यावरील आगमनामुळे त्यांच्या कागदाचा कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश झाला. (शेजवलकर, १९६४) इरफान हबीब यांच्या मते, इ.स.१२२३-२४ मध्ये गुजरातमध्ये कागदावर लिहिलेले हस्तलिखित सापडले आहे. (हबीब, १९९६ : ३२) महाराष्ट्रात लेखनासाठी ताडपत्रांचा आणि कापडाचा वापर होत असावा. शिवकालापासून पुढे शिलालेख, ताम्रपट, कार्पासपट मागे पडून कागद सर्वत्र रूढ झालेला दिसतो. (शेजवलकर, १९६४)
लेखननिविष्ट वाङ्मय थोडेफार असेल, पण त्याहून मौखिक वाङ्मय बरेच असण्याची शक्यता आहे. राजवाडे यांच्या मते, शक १०५१ त (इ.स.११२९) मराठीत पद्य सारस्वत होते. ज्ञानदेवीपूर्वी १६१ वर्षे मराठीत पद्य सारस्वत होते हे आता निश्चित आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे.
इ.स.११२९ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ अथवा ‘अभिलषितार्थचिंतामणी’ तील मराठी पदापासून इ.स.१२९० मध्ये लिहिल्या गेलेल्या ज्ञानदेवीपर्यंतच्या मधल्या दीडशे वर्षात काहीही साहित्यनिर्मिती झालेली नसणे अशक्यच आहे. ती उपलब्ध नाही एवढेच.
उपलब्ध ग्रंथांच्या आधाराने मराठी साहित्याच्या इतिहासाचा आरंभ यादवकालात होतो. सातवाहन ते यादव हा जसा राजवटींमधल्या बदलाचा काळ आहे तसाच महाराष्ट्री-प्राकृत, महाराष्ट्री-अपभ्रंश, मराठी हा भाषित परिवर्तनाचाही काळ आहे. साहित्यात संस्कृतऐवजी प्राकृताचा अवलंब ही गोष्ट जरी सातवाहनांच्या काळात घडलेली असली तरी धर्मकारणासाठी मराठीचा अवलंब ही घटना यादवकाळातच घडलेली आहे. मराठीच्या आरंभकाळातले उपलब्ध साहित्य मनोविनोदनासाठी लिहिले गेलेले साहित्य नसून जनसाधारणांच्या आध्यात्मिक मुक्तीसाठी लिहिले गेलेले आहे. त्यामुळे मराठी साहित्याचा इतिहास लिहिताना केवळ राजवटींचा इतिहास उपयोगाचा ठरत नाही. राजवटींबरोबरच विविध ग्रंथ आणि संप्रदाय यांचाही मागोवा घेणे अटळ ठरते. मराठीतल्या आरंभकाळातल्या साहित्याला विविध उपासना पंथांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यातला अत्यंत महत्त्वाचा पंथ म्हणजे नाथपंथ होय. नाथपंथ हा यादव साम्राज्यातला एक प्रभावी संप्रदाय होता. डॉ. जोगळेकर यांच्या मते, महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून प्रभावशाली ठरलेल्या महानुभाव, वारकरी आदी सर्व संप्रदायांचा मूलस्रोत नाथसंप्रदायच आहे आणि नंतरच्या संप्रदायांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नाथसंप्रदायाचीच तत्त्वे अंगिकारली आहेत असे दिसून येते. रा.चिं.ढेरे यांच्या मते, नाथसंप्रदायाची प्रथम लीलास्थली आहे. (जोगळेकर, १९८४ : १७४)
यादवकाळात साम्राज्यविस्तार झालेला होता, मंदिरे बांधली जात होती, दाने दिली जात होती. व्रतवैकल्ये यांना महत्त्व दिले जात होते, परंतु एकंदरीत समाजव्यवस्थेचा ताणाबाणा पाहिला तर सामान्यजन आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक स्तरांवर अभावांनी ग्रस्त होते असेच म्हटले पाहिजे. राजवटीच्या आश्रयाने समाजातला एक विशिष्ट स्तर फोफावत जातो आणि बाकीचा समाज समृद्धीच्या फळांपासून वंचित राहतो. यादवकाळातल्या संस्कृत साहित्याचा सामान्य जनतेशी काहीही संबंध राहिलेला नव्हता. पंडित आणि राजाच्या दरबारासाठीच ते लोक लिहित होते. संस्कृतमध्ये साहित्य विपुल लिहिले गेले पण त्यात मौलिकता, चैतन्य आणि प्रेरकतेचा अभाव होता.
ज्योतिषरत्नमाला
‘श्रीपति भट्ट’ याने १०३९ च्या सुमारास मूळ संस्कृतात हा ग्रंथ रचला व त्यावर संस्कृतात व मराठीत टीकाही लिहिली. मराठीत उपलब्ध असलेली ही टीका अपूर्ण आहे. या ग्रंथाची एकूण ७४ पृष्ठे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांना सापडली व तीही मूळ मराठी पोथी नसून त्यांच्या मते, १४४७ च्या सुमारास केव्हा तरी केलेली तिचा नक्कल आहे. ही पोथी राजवाडे यांनी १९९४ साली ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या वार्षिक इतिवृत्तांत छापून प्रसिद्ध केली.
‘तेया ईश्वररूपा कालाते मि
ग्रंथकर्ता श्रीपति नमस्कारी ।।’
अशी सुरुवात करून प्रस्तृत ग्रंथात श्रीपतीने युगे, संवत्सरे, त्यांचे स्वामी, ऋतू, मास, राशी, तिथी, महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व व त्या दिवशी करावयाची कर्तव्ये, शुभाशुभ योग इत्यादींची चर्चा केली आहे. मराठीतल्या हा या प्रकारचा पहिलाच ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच. परंतु राजवाडे यांच्या मते, या ग्रंथांतील भाषेचे स्वरूप पाहता तो ‘मराठीतील आद्य ग्रंथ’ आहे. राजवाडे यांच्या या मताशी इतर वाङ्मयेतिहासकार व संशोधक सहमत नाहीत.
लीळाचरित्र
महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल १२८३ च्या आसपास.
लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून १५०० पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या.
चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत.
लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात.
विवेकसिंधु
मुकुंदराजाने हा ग्रंथ १३६५ च्या सुमारास लिहिला. प्रा.कृ.पां.कुळकर्णी आणि वि.ल.भावे या ग्रंथाला मराठीतील आद्य ग्रंथ मानतात. हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पूर्वीचा असे त्यांचे मत होते. नवीन संशोधन हा ग्रंथ १३६५ च्या सुमारास लिहिला असे मानते.
विवेकसिंधु हा ग्रंथ उपनिषदांच्या मंथनातून तयार झालेला, शांकर अद्वैत मताचे प्रतिपादन करणारा आहे. विशेषतः ‘योगवासिष्ठ’ या ग्रंथाचा प्रभाव या ग्रंथावर आढळतो. मायावादाचे सूत्रबद्ध विवेचन या ग्रंथात केले आहे.
विवेकसिंधुत पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून एकूण १८ प्रकरणे आहेत. १६८४ पर्यंत ओवी संख्या आहे. गुरु-शिष्यसंवाद रूपाने येथे ब्रह्मज्ञान सांगितले आहे. शास्रीय विषयाचे यात निरूपण आले आहे. पहिल्या भागात सृष्टीची उभारणी, दुसऱ्या भागात सृष्टीचा संहार आणि जीव, प्रपंच, परमेश्वर, जीव मुक्ती यांचे विवेचन केले आहे. ‘ग्रंथीचे हेंचि चातुर्य । जे रोकडे स्वानुभव सौंदर्य । म्हणौनि सेवीतु मुनिवर्य । विवेकसिंधु हा ।।’ असे भाषासौष्ठव असणारा हा ग्रंथ रचनादृष्ट्या सुंदर आहे. त्यात लेखकाची बहुश्रुतता दिसते. प्रतिभासृष्टी संपन्न व समृद्ध आहे. कल्पनाविलास व विविध अलंकाराची योजना त्यात आहे. मराठीचा गौरव
‘धुळी आंतील रत्न । जरि भेटे न करिता प्रेत्न ।
तरी चतुरी येत्न । का न करावा ।’
या शब्दांत केला आहे. ‘ मराठी भाषेतल्या वेषातला शांकरमठातला सुबोध वेदान्त पाठ ’ म्हणजे विवेकसिंधु असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांनी म्हटले आहे.
संदर्भः संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश - खंड १
संपादकः जया दडकर, प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, सदानंद भटकळ