Sunday, 8 March 2015

शिवजन्म उत्सव ( शिव जयंती )

शिवजन्म ( साभार चंद्रशेखर पिलाने )
“राजा श्रीशिवछत्रपति” बोलताच एक उज्वल भविष्य मांडणारे हिंदूस्थान कर्तुत्ववान व्यक्तिमत्व, प्रचंड इच्छा शक्ति अन आपल्या मावळ्यांवर बंधू सारखे प्रेम करणारे “राजा श्रीशिवछत्रपति शिवराय”..........
अखंड हिंदूस्थान मध्ये १४६० च्या काळात हिंदूंवर होणारा अत्याचारामध्ये निजामशाही, मुघलशाही, कुत्बशाही, इमादशाही आणि बरीदशाही यांनी तर समस्त हिंदूंची इच्छापूर्ती संपुष्ठात आणली. श्री भगवान श्री कृष्णांनी सांगितलेले उद्गार
“जेव्हा जेव्हा या पवित्र पावन धर्तीवर अत्याचार, व्यभिचार, मानव अहितकार अश्या अनेक संकटाना व्याधीतून मुक्त करण्यासाठी एक परमात्मा या भूमीवर जन्म घेईल” आणि तो दिवस उजाडला १५५१ शुक्ल संवत्सर फाल्गुन शुद्ध तृतीया “राजा शिवछत्रपति” यांनी मातोश्री “जिजाऊसाहेब” यां स्वातंत्र्यदेवीच्या उदरात जन्म घेतला.लहानपणा पासून हिंदू धर्माची शिकवण शिवछत्रपतिंना जिजाऊसाहेब यांनी महाभारत, पुराण व इतर पवित्र ग्रंथ हि सारी शिवछत्रपतिंची अध्ययन केंद्र होती. भगवान श्री कृष्ण यांच्या राजनीतीचे रुपांतर शिवनीती मध्ये कसे मांडावे याचे शिकवण सुद्धा जिजाऊसाहेबां बरोबर श्रीमंत श्री शहाजी राजे यांनी सुद्धा दिली. पण जस जसा शिवकाळ व शंभूकाळ संपत आला आणि अखंड हिंदूस्थानाला उतरती कळा लागू लागली.....
ती म्हणजे पोर्तुगीज व इंग्रज ......
इंग्रज आले व्यापार केला व लालसे पोटी सत्ता उपभोगास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी संपूर्ण हिंदूस्थान पादांक्रांत करून आपली संस्कृती हिंदूस्थानच्या माथ्यावर मारण्याची सुरुवात केली आणि आपण मात्र ती उदार मनाने स्वीकारली. संपूर्ण हिंदूस्थानात सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक कारभार हा इंग्रजी कालगणनेनुसार चालतो. या हिंदूस्थानातील दिनदर्शिका हि इंग्रजी कालगणनेनुसार तयार केल्या जातात. श्रीशिवछत्रपतिंची जयंती हि इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी आली होती. सरकार व संबंधीत निरनिराळ्या अनुशासनालयें यांच्यात एक वाक्यता राखण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी श्रीशिवछत्रपतिंची जयंती उत्सव साजरा केला जातो. आणि तो शासकीय संमत सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. पण त्या इंग्रजी कालगणनेत सुद्धा किती एक सूत्रता आहे का ? याचा विचार आपण कधी केला आहे का ? तो सुद्धा श्रीशिवछत्रपतिंच्या जयंती बद्दल यावर एकचं उत्तर नाही ......
इंग्रजी कालगणना आणि त्यामधील त्रुटींमुळे इसवी सन १५८२ साली पोप ग्रेगरी यांनी बाद केले व ४ ऑक्टोबर १५८२ नंतर पुढील दिवस १५ ऑक्टोबर १५८२ आहे असे समजावे असा फतवा काढला. अर्थात त्यातील त्यांनी त्या वर्षातील १० दिवस बाद केले. युरोपातील कॅथॉलिक देशांनी ताबडतोब नव्या ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. परंतू जगभर साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या प्रोटेस्टंट ब्रिटनने मात्र २ सप्टेंबर १७५२ पर्यंत ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला नाही. ब्रिटनच्या साम्राज्यात ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणना चालू राहिली. अर्थातच भारतातही सारा इतिहास हा ज्युलियन दिनांकात रुपांतर करण्यात आले. १७५२ साली २ सप्टेंबरच्या पुढील दिवस १४ सप्टेंबर असेल, असे घोषित ब्रिटनने ग्रेग्रोरियन कॅलेंडरशी जुळवून घेतले.(१)
अर्थातचं मग आपणचं का ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणनचे स्वीकार करून आपल्या हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा का देतो ??????
आता आपण तिथी संस्कृती पाहू....... आपणांस माहितचं असेल कि इंग्रजी वर्ष म्हणजे “इ.स.” आणि भारतीय वर्ष शके (संवत्सर) यांच्यामध्ये ७८ वर्षांचा फरक आहे. ७८ वर्षे मिळवली तर इंग्रजी कालगणने नुसार आपल्याला इसवी सन मिळते ते उदा. ( शके (संवत्सर) १५५१+७८ = (इसवी सन) १६२९ ) आपणांस हि संख्या मिळते आणि इतर सर्व शिवकालीन इतिहासकारांनी अशी पद्धत स्वीकारलेली आहे हे आपणांस माहितचं असेल.....
आता आपण शिवकालीन इतिहास संकलक श्री. आप्पा परब यांनी मिळवलेली माहिती पाहू....
१) राजाभिषेक शकावली १६७४
२) शिवापूरवही शकावली १६७४
३) दासपंचायन शकावली १६९६
४) * जेधे शकावली १६९७ (अत्यंत महत्वपूर्ण माहिती)
या चार शकावली शिवजन्मतिथी नोंदताना “ शके (संवत्सर) १५५१“ ची नोंद करण्यास विसरत नाही. त्यातही जेधे शकावली विस्तृतपणे सांगते कि, शुक्ल संवत्सरे शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीय, शुक्रवार, हस्त नक्षत्र, घटी १८, पळे ३१, गड ५, पळे ७ ये दिवसीं राजश्री शिवाजीराजे शिवनेरीस उपजले. (२)
त्याच सोबत कविश्वर परमानंदांनी पोलादपूर येथे “शिवभारत” या काव्यग्रंथात ६ व्या अध्यायांत २६, २७ व २८ श्लोकांत श्रीनृप शालिवाहन शके १५५१, शुक्लनाम संवत्सर, उत्तरायण, शिशिरऋतू मध्ये फाल्गुन वद्य तृतीय जन्म झाला अशी नोंद केलेली आहे. (३)
हिंदूस्थानातील दक्षिणेतील कर्नाटक मधील बृहदेश्वरमंदिर शिळालेख, उत्तरेतील राजस्थानातील शिवजन्मपत्रिका, पूर्वेकडील कारी (?) येथील शकावली, हिंदूस्थानातील पश्चिमेकडील शिवभारत काव्यग्रंथ या चारही संदर्भातून आई जिजाऊ यांच्या पोटी षष्ठम पुत्रजन्माचे लिखित प्रमाण मिळते. श्रीसातवाहन शके १५५१, शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्य तृतीय शुक्रवार ये दिवशी राजश्री शिवाजीराजे किल्ले शिवनेरीवर उपजले. (४)
श्रीनृप शालिवाहन १५५१, शुक्लनाम संवत्सर, उत्तरायण, फाल्गुन वद्य तृतीय, शिशिर ऋतू, सूर्यास्तानंतर जिजाबाई साहेब यांचे उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला. त्या दिवशी इंग्रजी दिनांक होता १ मार्च १६३० (ज्युलियन दिनांक १९ फेब्रुवारी). (५)
भारतीय तीथ - फाल्गुन वद्य तृतीय, शुक्लनाम संवत्सर १५५१, जन्म स्थान : शिवनेरी, जन्म वेळ : सायंकाळी ७ वाजता, उदित रास : सिंह (६)
इसवी सन पूर्वी सातवाहनांनी आपले साम्राज्य या दंडकारण्यात निर्माण केले. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण या अतिप्राचीन शहराची कीर्ती दूरदूर पर्यंत दिगंत पसरवली. सातवाहनांपासून पुढे तेराव्या शतकापर्यंत महान अश्या राष्ट्राची संस्कृती चहू बाजूंनी बहरवली आणि फुलवली सुद्धा हे मोठे अग्रस्थानी मांडिले पाहिजे.
सातवाहनानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, कलचुरी, शिलाहार व यादव अश्या राजकुळांनी महाराष्ट्राला प्रगती पथावर अग्रेसर केले. आज आपण त्याचं हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा देत आहोत हे सत्य आहे कि नाही. ??? आपण इंग्रजी कालगणना फक्त सरकारी व इतर आर्थिक व्यवहारात योजिले तर काही गैर नाही परंतु आपल्या पुढील पिढीला मात्र हिंदूस्थानातील तिथी संस्कृती विषयी तरी योग्य ते मार्गदर्शन केलेचं पाहिजे.
हीच एक विनंती .....
|| जय भवानी – जय जिजाऊ ||
|| जय श्री शिवछत्रपतिं ||
- संदर्भ
अ) शिवजन्म : (२), (३) पृष्ठ क्रमांक. ९ व १०, (४) पृष्ठ क्रमांक. ५ (शिवकालीन इतिहास संकलक श्री.आप्पा परब)
ब) खगोलीय शिवकाल (१) पृष्ठ क्रमांक. ५, (५),(६) पृष्ठ क्रमांक. ९ व १० (मोहन आपटे, पराग महाजनी)
( छायाचित्र साभार : महाजाल )
—© वरील सर्व हक्क संदर्भ लेखकांकडे आहेत.

No comments:

Post a Comment