२२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले.
पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वषेर्ं उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : ‘दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत र्अधकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते.’
पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. पश्चिम पंजाब (पाकिस्तान) ओलांडल्यानंतर बलुचिस्तान प्रांतातील डेरा बुगटी आदी भाग सुरू होतो. पानिपतच्या युद्धात बलुची सन्य अब्दालीच्या बाजूने लढले होते. पानिपत युद्धाच्या एक महिना अगोदर १५,००० बलुची घोडदळ अताईखान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला येऊन मिळाले. त्यामुळे अब्दालीची बाजू बळकट झाली होती. पानिपताच्या युद्धापूर्वी तीन वर्षे आधी १७५८ मध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक मीर नासीर खान नुरी (कलातचा खान) यांच्यामध्ये एक तह झालेला होता. या तहाच्या अटीनुसार मीर नासीर खान नुरीने अब्दालीला त्याच्या लष्करी कारवायांत सनिक पुरवायचे व त्या बदल्यात अब्दाली मीर नासीर खानाला सन्य ठेवण्यासाठी आíथक मदत करेल असे ठरले होते. अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानात परत आला त्यावेळेस कलातच्या खानाने अब्दालीकडे सन्य पुरविण्याच्या बदल्यात आíथक मोबदला मागितला. परंतु अब्दालीला हिन्दुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती. कारण दिल्लीचा बादशहा सततच्या आक्रमणांमुळे तसा कफल्लकच झालेला होता. आणि मराठय़ांकडूनदेखील युद्धात हत्ती, घोडे आणि तोफांव्यतिरिक्त काहीच आíथक घबाड पदरात पडले नव्हते. त्यामुळे अब्दालीने मराठा युद्धकैदीच पशांऐवजी मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केले. मराठा युद्धकैदी बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्धकैद्यांची त्यावेळची शारीरिक अवस्था हीदेखील असू शकते. युद्धकैदी जवळपास दोन-तीन महिने कैदेत होते आणि त्यांना अगदी तुटपुंज्या अन्नपाण्यावर दिवस काढावे लागले होते. अजून बोलन िखडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता. अगोदरच मानसिक व शारीरिकदृष्टय़ा खालावलेल्या मराठय़ांना या प्रदेशातून आणखी प्रवास जिवावर बेतला असता. त्यामुळेच अब्दालीने हा पुढचा विचार करून मराठय़ांना बलोच सरदारांना देऊन टाकले.
पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.
या युद्धकैद्यांपैकी बुगटी, र्मी, मझारी, रायसानी व गुरचानी इत्यादी बलोच जमातींमध्ये मराठा उपजमात आजही आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. पानिपत युद्धातील त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज आज धर्माने मुस्लीम झालेले आहेत खरे; परंतु त्यांना आपल्या मराठीपणाचा रास्त अभिमान आहे. या उपजमातींपकी फक्त बुगटी मराठय़ांविषयीची माहिती उपलब्ध आहे. बुगटी जमातीतील मराठय़ांचे तीन प्रमुख वर्ग पुढीलप्रमाणे-
बहुसंख्य मराठा युद्धकैदी हे काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून देण्यात आले आणि आज हा समाज त्या- त्या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो. उदा. काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा वगरे. आज हा वर्ग समस्त बुगटी मराठी लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के आहे. या वर्गाला गुलामगिरीत दिवस काढावे लागले. परंतु १९४४ मध्ये नबाब अकबर खान बुगटी (बुगटी जमातीचे मुख्य सरदार) यांनी मराठय़ांना या गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. १९४४ पर्यंत या मराठा वर्गाला प्रचंड शारीरिक कष्ट व हलाखीचे दिवस काढावे लागले. १९४४ पूर्वी त्यांची मुख्य कामे म्हणजे उंटांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, लोहारकाम व इतर छोटी-मोठी कामे करणे हेच असे. बुगटी मालक (आका) आणि त्यांचे मराठा गुलाम यांचे संबंध बऱ्यापकी जिव्हाळ्याचे होते. बुगटी मालक आपल्या कुटुंबाप्रमाणे मराठी गुलामांची देखभाल करीत असे. नियमाला ज्याप्रमाणे अपवाद असतो, त्याप्रमाणे काही बुगटी मालक क्रूरसुद्धा होते व ते मराठा गुलामांना अतिशय वाईट पद्धतीने वागवीत असत असे सांगितले जाते.
प्रत्येक बलुची जमातीमध्ये त्यांचे स्वत:चे असे कायदे (जिर्गा) असतात. पूर्वी मराठय़ांना इतर बुगटी जमातींच्या तुलनेत असमान आणि जाचक असे कायदे लागू होते. उदाहरणार्थ, सियाकारी- म्हणजे Honour killing च्या कायद्यानुसार एखाद्या बुगटी व्यक्तीने दुसऱ्या बुगटी व्यक्तीचा वध केला तर वध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वध केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला मारण्याची मुभा होती. परंतु एखाद्या बुगटी व्यक्तीने मराठा व्यक्तीचा वध केला तर वधास वध हा कायदा त्यांच्या बाबतीत मात्र लागू नव्हता. अपराधी बुगटी व्यक्तीला माफक दंड करून सोडून देण्यात येत असे. याउलट, एखाद्या मराठा व्यक्तीने बुगटी व्यक्तीचा खून केला तर एका वधास दोन वध- असा विरोधाभासी कायदाही अस्तित्वात होता.
१९४४ साली हा मराठा समाज गुलामगिरीतून मुक्त झाला व जिर्गातले असमान कायदेही काळानुरूप रद्द करण्यात आले. गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही काही काळ या वर्गाने त्यांच्या बुगटी मालकांबरोबरच राहणे पसंत केले. कारण इतकी वष्रे गुलामगिरीत राहिल्यानंतर त्यांच्यात एक कमीपणाची भावना होती. अलीकडच्या काळात मात्र हळूहळू हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.
१९६० नंतर या समाजाने अन्य बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात बरीच आघाडी घेतली. कारण बाकीचा बुगटी समाज हा त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीतच अडकून पडलेला होता. त्यामुळे सरकारी नोकऱ्या तसेच ‘सुई पेट्रोलियम कंपनी’त बहुसंख्येने या मराठा समाजाने आपले बस्तान बसविले. बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर १९५० च्या दशकात सुई पेट्रोलियम कंपनी सुई येथे सुरू करण्यात आली. सुरुवातीला कामगार, फोरमन म्हणून मराठा समाजाला तिथे कामे मिळाली आणि हळूहळू त्यांच्यापकी काहीजण मॅनेजर, सुपरवायझर अशा पदांवरदेखील पोहोचले. आज हा मराठा समाज काळाशी जमवून घेत स्वत:च्या कर्तृत्वावर प्रगती करतो आहे व सुखात नांदतो आहे, ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.
दुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज (शाहू मराठा). मराठा युद्धकैद्यांपकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता. बुगटी प्रांत हा बराचसा कोरडा व वाळवंटी आहे. तेथे शेती केली जात नव्हती. बलुची टोळ्या या भटक्या होत्या आणि शेती करण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते. मॅरो तसेच सिआहफ या डेरा बुगटीजवळील काही भागात पाणी उपलब्ध होते. मराठा युद्धकैद्यांपकी ज्यांना शेतीचे चांगले ज्ञान होते अशांना बुगटी सरदाराने या भागात शेती करण्यासाठी अनुमती दिली; जेणेकरून बुगटी लोकांसाठी अन्नधान्याची तरतूद होईल. साहू मराठय़ांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला व अतिशय उत्तम प्रकारे शेती केली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गहू व बाजरी यासारखी धान्ये ते पिकवीत असत.
इतर बुगटी जमाती या त्यांच्या मूळ सरदारांच्या नावाने परिचित आहेत. उदा. रहेजा बुगटी जमातीचे ‘रहेजा’ हे नाव त्यांच्या रहेजा या पूर्वज सरदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच या वर्गाने आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘शाहू’ हे नाव छत्रपती शाहूंच्या नावावरून धारण केले. शाहू मराठय़ांच्या गढवानी, रंगवानी, पेशवानी, किलवानी वगरे सात उपशाखा आहेत. या शाखा कशा तयार झाल्या, याबद्दलची माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. परंतु ‘पेशवानी’ हे नाव पेशव्यांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे.
शाहू मराठे जरी धर्माने मुस्लीम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे, घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे, इ. पद्धती महाराष्ट्रात जरी आज लुप्त होत आल्या असल्या (केवळ काही ग्रामीण भागातच टिकून असल्या) तरी साहू मराठय़ांमध्ये अजूनही त्या प्रचलित आहेत. त्यांच्यामुळे काही मराठी शब्दही बलुची भाषेत आलेले आहेत. उदा.‘आई’ हा शब्द साहू मराठय़ांमध्ये आईला संबोधित करायला अजूनही वापरला जातो. मूळच्या बुगटी समाजानेही हा शब्द स्वीकारला आहे. स्त्रियांची काही मराठी नावे- कमोल (कमळ), गोदी (‘गोदावरी’चे संक्षिप्त रूप), गौरी, सबुला (सुभद्रा) अजूनही त्यांच्यात वापरली जातात. विनोदाची गोष्ट म्हणजे जसे मराठीत सुनीलचे ‘सुन्या’ असे टोपणनाव होते तसेच अजूनही साहू मराठय़ांमध्ये टोपणनाव ठेवले जाते. उदा. कासीम या नावाचे टोपणनाव ‘कासू’ असे केले जाते.
तिसरे- दरुरग मराठा! बुगटी मराठय़ांच्या तीन वर्गापकी हा वर्ग संख्येने सर्वात कमी आहे. हा वर्ग सुरुवातीपासून बुगटी सरदारांशी संबंधित होता व त्यामुळे त्यांना मोठा मान मिळत असे. आज या वर्गातले काही लोक मोठे जमीनदार आहेत. या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाइलवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो.
या तिन्ही वर्गातील मराठी बांधवांनी इतर बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात लवकर प्रगती केली. आज या समाजातील लोक इंजिनीअर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रोफेसर व उच्चपदस्थ राजकारणी आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही इतर बुगटी समाजापेक्षा चांगली आहे. १९९५ साली अकबर एस. अहमद (पाकिस्तानी राजनतिक अधिकारी व समाजशास्त्रज्ञ) यांनी लिहिलेल्या एका संशोधनपर निबंधातही या मराठा समाजाचा त्यांच्या पूर्वीच्या बुगटी मालकांपेक्षा अधिक उत्कर्ष झाल्यामुळे एकुणात बुगटी समाजात झालेल्या सामाजिक उलथापालथीची नोंद घेण्यात आली आहे.
सध्या डेरा बुगटी गावातील २०,००० लोकसंख्येपकी ३० टक्के म्हणजे ७००० लोक मराठा आहेत. तर सुई शहराच्या ८०,००० लोकसंख्येपकी दहा टक्के लोकसंख्या- म्हणजे ८००० लोक मराठा आहेत. सुई म्युनिसिपल कौन्सिलचे व्हाइस चेअरमन व डेरा बुगटी म्युनिसिपल कौन्सिलचे विरोधी पक्षनेते व १४ सदस्यांपकी सातजण हे मराठा सदस्य आहेत. इतर बुगटी जमातींप्रमाणे मराठा समाजाचा जिर्गादेखील आहे.
१९६० च्या दशकात सिल्विया मॅथेसन या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या ‘टायगर्स ऑफ बलुचिस्तान’ या पुस्तकात बुगटी मराठा समाजाचे उल्लेख आढळतात. लेखिकेचे पती सुई पेट्रोलियम कंपनीत नोकरीला होते. लेखिकेने बुगटी मराठा समाजजीवनाचे वास्तवदर्शी वर्णन या पुस्तकात केले आहे. मट्रा (‘मराठा’ शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश) लोक रंगाने काळेसावळे, लहान उंचीचे आहेत आणि इतर बुगटी समाजापेक्षा वांशिकदृष्टय़ा भिन्न आहेत. या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, या मराठा लोकांना १५ व्या शतकात हुमायून बादशहाला जेव्हा मीर चाकूर खान (बुगटी सरदार) याने दिल्लीजवळील युद्धात मदत केली त्यावेळेस बंदी बनवून गुलाम म्हणून येथे आणण्यात आले. परंतु हे साफ चुकीचे वाटते. कारण १५ व्या शतकात मराठा सन्य उत्तरेत गेले होते याबद्दलचे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त या पुस्तकात मराठा व पठाण गटांमध्ये झालेल्या दंगलीचे, तसेच दोन मराठा पोस्टमन रोज रात्री सुई ते डेरा बुगर्ट व पुन्हा परत असे ६० कि. मी. अंतर पायी कसे चालत जात, आणि एका मराठा गुलाम व्यक्तीने एका अवघड कडय़ावर चढून जाऊन आपल्या मालकाबरोबर लावलेली पज कशी जिंकली आणि त्या बदल्यात स्वत:ची गुलामगिरीतून कशी सुटका करून घेतली, याचे वर्णन केलेले आहे.
१९९० च्या दशकात जेव्हा िहदी चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी नव्हती, त्यावेळेस डेरा बुगटी येथे ‘तिरंगा’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात लागला होता. त्यात नाना पाटेकरांनी एका मराठी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात जेव्हा नाना पाटेकर ‘मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं’ हा संवाद म्हणतात, त्यावेळी चित्रपटगृहातील या मराठा प्रेक्षकांनी हर्षांने शिट्टय़ा वाजवत एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येते. बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी ‘द ग्रेट मराठा’ ही िहदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली.
बलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे प्रसिद्ध िहदी गीत ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत. सब्ज अली बुगटींचे मूळ बलुची गाणे यू-टय़ूबवर ऐकता येऊ शकते. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे ‘लवानी लला’ हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा या बलुची वाद्यावर बऱ्याच मराठा कलाकारांची चांगलीच हुकूमत आहे.
मात्र आज बुगटी मराठा समाज बुगटी जमातीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे त्यांना मराठी भाषा, त्यांच्या पूर्वजांची नावे आणि इथल्या मूळ गावाचे नाव याबद्दल काहीच ज्ञात नाही.
एकंदरीने पानिपतावरील युद्धात झालेली हानी ही आपण समजतो त्यापेक्षा निश्चितच खूप अधिक होती. बहुसंख्य मराठा युद्धकैदी आणि त्यांच्या वंशजांना १८५ वष्रे त्यामुळे गुलामगिरीत दिवस काढावे लागले. आजवरच्या त्यांच्या पिढय़ांतील मराठय़ांची संख्या ही पानिपतात शहीद झालेल्या मराठा सनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल.
बुगटी समाजाव्यतिरिक्त इतर बलुची समाजातल्या (र्मी, रायसानी वगरे) मराठा समाजाची आज काय स्थिती आहे, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. बलुचिस्तानात उन्हाळ्यात पारा ५०० से. च्या वर जातो. धुळीची मोठी वादळेही वारंवार होत असतात. अशा खडतर प्रदेशामध्ये टिकून राहून आपल्या पुढच्या पिढय़ांची उत्तम काळजी घेणाऱ्या आणि अद्यापही आपल्या मराठीपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या या सहय़ाद्रीच्या कणखर मराठी समाजाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आजची बुगटी मराठय़ांची पिढी सुखात आहे. भारतातील मराठी समाजाने त्यांची दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
सध्या बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानी लष्कराच्या अमलाखाली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधही सध्या तितकेसे चांगले नाहीत. त्यामुळे बुगटी मराठा समाजाशी संबंध प्रस्तापित करणे तितकेसे सोपे नाही. भारतातील मराठी समाज या बुगटी बांधवांचे निश्चितच देणे लागतो यात दुमत नाही. जरी हा समाज स्वत:ला ‘मराठा’ म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील केवळ ‘मराठा’ या जातीशी संबंधित नाही. कारण पानिपतात अठरापगड जातीचे सनिक व सरदार लढले होते. मराठीजन व महाराष्ट्र सरकार यांना या समाजाबद्दल माहिती मिळावी, या हेतूने केलेला हा लेखप्रपंच. भविष्यात आपल्यापासून दुरावलेल्या या मराठीजनांसाठी आपल्याला थोडेबहुत काहीतरी करण्याची इच्छा व्हावी, हीच त्यामागची अपेक्षा.
आनंद शिंदे
आनंद शिंदे
लोकसत्ता संग्रहित लेख
No comments:
Post a Comment