Sunday, 8 March 2015

शिवजन्म उत्सव ( शिव जयंती )

शिवजन्म ( साभार चंद्रशेखर पिलाने )
“राजा श्रीशिवछत्रपति” बोलताच एक उज्वल भविष्य मांडणारे हिंदूस्थान कर्तुत्ववान व्यक्तिमत्व, प्रचंड इच्छा शक्ति अन आपल्या मावळ्यांवर बंधू सारखे प्रेम करणारे “राजा श्रीशिवछत्रपति शिवराय”..........
अखंड हिंदूस्थान मध्ये १४६० च्या काळात हिंदूंवर होणारा अत्याचारामध्ये निजामशाही, मुघलशाही, कुत्बशाही, इमादशाही आणि बरीदशाही यांनी तर समस्त हिंदूंची इच्छापूर्ती संपुष्ठात आणली. श्री भगवान श्री कृष्णांनी सांगितलेले उद्गार
“जेव्हा जेव्हा या पवित्र पावन धर्तीवर अत्याचार, व्यभिचार, मानव अहितकार अश्या अनेक संकटाना व्याधीतून मुक्त करण्यासाठी एक परमात्मा या भूमीवर जन्म घेईल” आणि तो दिवस उजाडला १५५१ शुक्ल संवत्सर फाल्गुन शुद्ध तृतीया “राजा शिवछत्रपति” यांनी मातोश्री “जिजाऊसाहेब” यां स्वातंत्र्यदेवीच्या उदरात जन्म घेतला.लहानपणा पासून हिंदू धर्माची शिकवण शिवछत्रपतिंना जिजाऊसाहेब यांनी महाभारत, पुराण व इतर पवित्र ग्रंथ हि सारी शिवछत्रपतिंची अध्ययन केंद्र होती. भगवान श्री कृष्ण यांच्या राजनीतीचे रुपांतर शिवनीती मध्ये कसे मांडावे याचे शिकवण सुद्धा जिजाऊसाहेबां बरोबर श्रीमंत श्री शहाजी राजे यांनी सुद्धा दिली. पण जस जसा शिवकाळ व शंभूकाळ संपत आला आणि अखंड हिंदूस्थानाला उतरती कळा लागू लागली.....
ती म्हणजे पोर्तुगीज व इंग्रज ......
इंग्रज आले व्यापार केला व लालसे पोटी सत्ता उपभोगास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी संपूर्ण हिंदूस्थान पादांक्रांत करून आपली संस्कृती हिंदूस्थानच्या माथ्यावर मारण्याची सुरुवात केली आणि आपण मात्र ती उदार मनाने स्वीकारली. संपूर्ण हिंदूस्थानात सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक कारभार हा इंग्रजी कालगणनेनुसार चालतो. या हिंदूस्थानातील दिनदर्शिका हि इंग्रजी कालगणनेनुसार तयार केल्या जातात. श्रीशिवछत्रपतिंची जयंती हि इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी आली होती. सरकार व संबंधीत निरनिराळ्या अनुशासनालयें यांच्यात एक वाक्यता राखण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी श्रीशिवछत्रपतिंची जयंती उत्सव साजरा केला जातो. आणि तो शासकीय संमत सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. पण त्या इंग्रजी कालगणनेत सुद्धा किती एक सूत्रता आहे का ? याचा विचार आपण कधी केला आहे का ? तो सुद्धा श्रीशिवछत्रपतिंच्या जयंती बद्दल यावर एकचं उत्तर नाही ......
इंग्रजी कालगणना आणि त्यामधील त्रुटींमुळे इसवी सन १५८२ साली पोप ग्रेगरी यांनी बाद केले व ४ ऑक्टोबर १५८२ नंतर पुढील दिवस १५ ऑक्टोबर १५८२ आहे असे समजावे असा फतवा काढला. अर्थात त्यातील त्यांनी त्या वर्षातील १० दिवस बाद केले. युरोपातील कॅथॉलिक देशांनी ताबडतोब नव्या ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. परंतू जगभर साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या प्रोटेस्टंट ब्रिटनने मात्र २ सप्टेंबर १७५२ पर्यंत ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला नाही. ब्रिटनच्या साम्राज्यात ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणना चालू राहिली. अर्थातच भारतातही सारा इतिहास हा ज्युलियन दिनांकात रुपांतर करण्यात आले. १७५२ साली २ सप्टेंबरच्या पुढील दिवस १४ सप्टेंबर असेल, असे घोषित ब्रिटनने ग्रेग्रोरियन कॅलेंडरशी जुळवून घेतले.(१)
अर्थातचं मग आपणचं का ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणनचे स्वीकार करून आपल्या हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा का देतो ??????
आता आपण तिथी संस्कृती पाहू....... आपणांस माहितचं असेल कि इंग्रजी वर्ष म्हणजे “इ.स.” आणि भारतीय वर्ष शके (संवत्सर) यांच्यामध्ये ७८ वर्षांचा फरक आहे. ७८ वर्षे मिळवली तर इंग्रजी कालगणने नुसार आपल्याला इसवी सन मिळते ते उदा. ( शके (संवत्सर) १५५१+७८ = (इसवी सन) १६२९ ) आपणांस हि संख्या मिळते आणि इतर सर्व शिवकालीन इतिहासकारांनी अशी पद्धत स्वीकारलेली आहे हे आपणांस माहितचं असेल.....
आता आपण शिवकालीन इतिहास संकलक श्री. आप्पा परब यांनी मिळवलेली माहिती पाहू....
१) राजाभिषेक शकावली १६७४
२) शिवापूरवही शकावली १६७४
३) दासपंचायन शकावली १६९६
४) * जेधे शकावली १६९७ (अत्यंत महत्वपूर्ण माहिती)
या चार शकावली शिवजन्मतिथी नोंदताना “ शके (संवत्सर) १५५१“ ची नोंद करण्यास विसरत नाही. त्यातही जेधे शकावली विस्तृतपणे सांगते कि, शुक्ल संवत्सरे शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीय, शुक्रवार, हस्त नक्षत्र, घटी १८, पळे ३१, गड ५, पळे ७ ये दिवसीं राजश्री शिवाजीराजे शिवनेरीस उपजले. (२)
त्याच सोबत कविश्वर परमानंदांनी पोलादपूर येथे “शिवभारत” या काव्यग्रंथात ६ व्या अध्यायांत २६, २७ व २८ श्लोकांत श्रीनृप शालिवाहन शके १५५१, शुक्लनाम संवत्सर, उत्तरायण, शिशिरऋतू मध्ये फाल्गुन वद्य तृतीय जन्म झाला अशी नोंद केलेली आहे. (३)
हिंदूस्थानातील दक्षिणेतील कर्नाटक मधील बृहदेश्वरमंदिर शिळालेख, उत्तरेतील राजस्थानातील शिवजन्मपत्रिका, पूर्वेकडील कारी (?) येथील शकावली, हिंदूस्थानातील पश्चिमेकडील शिवभारत काव्यग्रंथ या चारही संदर्भातून आई जिजाऊ यांच्या पोटी षष्ठम पुत्रजन्माचे लिखित प्रमाण मिळते. श्रीसातवाहन शके १५५१, शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्य तृतीय शुक्रवार ये दिवशी राजश्री शिवाजीराजे किल्ले शिवनेरीवर उपजले. (४)
श्रीनृप शालिवाहन १५५१, शुक्लनाम संवत्सर, उत्तरायण, फाल्गुन वद्य तृतीय, शिशिर ऋतू, सूर्यास्तानंतर जिजाबाई साहेब यांचे उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला. त्या दिवशी इंग्रजी दिनांक होता १ मार्च १६३० (ज्युलियन दिनांक १९ फेब्रुवारी). (५)
भारतीय तीथ - फाल्गुन वद्य तृतीय, शुक्लनाम संवत्सर १५५१, जन्म स्थान : शिवनेरी, जन्म वेळ : सायंकाळी ७ वाजता, उदित रास : सिंह (६)
इसवी सन पूर्वी सातवाहनांनी आपले साम्राज्य या दंडकारण्यात निर्माण केले. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण या अतिप्राचीन शहराची कीर्ती दूरदूर पर्यंत दिगंत पसरवली. सातवाहनांपासून पुढे तेराव्या शतकापर्यंत महान अश्या राष्ट्राची संस्कृती चहू बाजूंनी बहरवली आणि फुलवली सुद्धा हे मोठे अग्रस्थानी मांडिले पाहिजे.
सातवाहनानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, कलचुरी, शिलाहार व यादव अश्या राजकुळांनी महाराष्ट्राला प्रगती पथावर अग्रेसर केले. आज आपण त्याचं हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा देत आहोत हे सत्य आहे कि नाही. ??? आपण इंग्रजी कालगणना फक्त सरकारी व इतर आर्थिक व्यवहारात योजिले तर काही गैर नाही परंतु आपल्या पुढील पिढीला मात्र हिंदूस्थानातील तिथी संस्कृती विषयी तरी योग्य ते मार्गदर्शन केलेचं पाहिजे.
हीच एक विनंती .....
|| जय भवानी – जय जिजाऊ ||
|| जय श्री शिवछत्रपतिं ||
- संदर्भ
अ) शिवजन्म : (२), (३) पृष्ठ क्रमांक. ९ व १०, (४) पृष्ठ क्रमांक. ५ (शिवकालीन इतिहास संकलक श्री.आप्पा परब)
ब) खगोलीय शिवकाल (१) पृष्ठ क्रमांक. ५, (५),(६) पृष्ठ क्रमांक. ९ व १० (मोहन आपटे, पराग महाजनी)
( छायाचित्र साभार : महाजाल )
—© वरील सर्व हक्क संदर्भ लेखकांकडे आहेत.

Thursday, 5 March 2015

आद्य ग्रंथ

आद्य ग्रंथ
मराठी साहित्याचा आरंभ
इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत मराठी भाषेची चिन्हे शोधत जाता येते. या आधीच्या काळातही तिचे अस्तित्व असावे याचेही काही उल्लेख आढळतात. मात्र, ‘लीळाचरित्र’ अथवा ‘ज्ञानदेवी’च्या आधीचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आद्य मराठी ग्रंथ कोणता हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ हा आद्यग्रंथ असे समजले जात होते. परंतु साहित्यसंशोधकांच्या मते तो इ.स. ११८८ च्या बराच अलिकडचा, म्हणजे ‘ज्ञानदेवी’ नंतरचा (इ.स. १२९०) असावा. इ.स. १२७८ च्या सुमारास रचला गेलेला ‘लीळाचरित्र’ हाच आद्यग्रंथ ठरतो असे अभ्यासकांचे मत आहे.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘श्रीपतिकृत मराठी ज्योतिषरत्नमाला शक ९६१ सुमार’ या लेखात श्रीपतिगृह विरचित ज्योतिषरत्नमाला या संस्कृत ग्रंथाची त्याने स्वतःच केलेली टीका हा मराठीतील पहिला उपलब्ध ग्रंथ होय असे म्हटले आहे. मराठी वाङ्मयकोशात (खंड पहिला, संपादक श्री. गं. दे. खानोलकर) म्हटले आहे. ‘श्रीपतींची मराठी टीका गद्यात असून ती त्यांनी इ.स. १०५० मध्ये लिहिली. हा टीकाग्रंथ मराठीतील प्राचीनांत प्राचीन असा पहिलाच (उपलब्ध) गद्य ग्रंथ आहे असे आज तरी मानावयास हरकत नसावी.’ प्रा. श्री. रं. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. ‘शक ९६१ च्या पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आणि ज्योतिषरत्नमालेचा (मराठी टीकेसह) काल याच सुमाराचा असल्याने श्रीपतिभट्ट, विरचित ज्योतिषरत्नमालेवरील टीका हा मराठी भाषेतला आद्यग्रंथ ठरतो.’(राजवाडे समग्र साहित्, खंड दुसरा, प्रस्तावना)
ज्योतिषरत्नमाला, विवेकसिंधु, लीळाचरित्र, ज्ञानदेवी या आरंभीच्या उपलब्ध ग्रंथांखेरीज मराठीत लिहिले गेलेले साहित्य असले पाहिजे. ग्रंथलेखनासाठी आज जशी सामग्री उपलब्ध आहे तशी प्राचीन काळी नव्हती. कागदावर लिहिलेले उपलब्ध असे प्राचीनतम हस्तलिखित म्हणजे विठ्ठल गलंडकृत ‘रसकीमोदी’ची इ.स. १५३४ मध्ये लिहिली गेलेली प्रत हे होय. त्र्यं.शं. शेजवलकर यांच्या मते पंधराव्या शतकापर्यत कागदाचा प्रसार महाराष्ट्रात नव्हता. ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात बहामनी राजवटीत दौलताबाद, जुन्नर वगैरे ठिकाणी कागदाचे कारखाने निघू लागलेले असावेत. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांच्या पश्चिम किनाऱ्यावरील आगमनामुळे त्यांच्या कागदाचा कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश झाला. (शेजवलकर, १९६४) इरफान हबीब यांच्या मते, इ.स.१२२३-२४ मध्ये गुजरातमध्ये कागदावर लिहिलेले हस्तलिखित सापडले आहे. (हबीब, १९९६ : ३२) महाराष्ट्रात लेखनासाठी ताडपत्रांचा आणि कापडाचा वापर होत असावा. शिवकालापासून पुढे शिलालेख, ताम्रपट, कार्पासपट मागे पडून कागद सर्वत्र रूढ झालेला दिसतो. (शेजवलकर, १९६४)
लेखननिविष्ट वाङ्मय थोडेफार असेल, पण त्याहून मौखिक वाङ्मय बरेच असण्याची शक्यता आहे. राजवाडे यांच्या मते, शक १०५१ त (इ.स.११२९) मराठीत पद्य सारस्वत होते. ज्ञानदेवीपूर्वी १६१ वर्षे मराठीत पद्य सारस्वत होते हे आता निश्चित आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे.
इ.स.११२९ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ अथवा ‘अभिलषितार्थचिंतामणी’ तील मराठी पदापासून इ.स.१२९० मध्ये लिहिल्या गेलेल्या ज्ञानदेवीपर्यंतच्या मधल्या दीडशे वर्षात काहीही साहित्यनिर्मिती झालेली नसणे अशक्यच आहे. ती उपलब्ध नाही एवढेच.
उपलब्ध ग्रंथांच्या आधाराने मराठी साहित्याच्या इतिहासाचा आरंभ यादवकालात होतो. सातवाहन ते यादव हा जसा राजवटींमधल्या बदलाचा काळ आहे तसाच महाराष्ट्री-प्राकृत, महाराष्ट्री-अपभ्रंश, मराठी हा भाषित परिवर्तनाचाही काळ आहे. साहित्यात संस्कृतऐवजी प्राकृताचा अवलंब ही गोष्ट जरी सातवाहनांच्या काळात घडलेली असली तरी धर्मकारणासाठी मराठीचा अवलंब ही घटना यादवकाळातच घडलेली आहे. मराठीच्या आरंभकाळातले उपलब्ध साहित्य मनोविनोदनासाठी लिहिले गेलेले साहित्य नसून जनसाधारणांच्या आध्यात्मिक मुक्तीसाठी लिहिले गेलेले आहे. त्यामुळे मराठी साहित्याचा इतिहास लिहिताना केवळ राजवटींचा इतिहास उपयोगाचा ठरत नाही. राजवटींबरोबरच विविध ग्रंथ आणि संप्रदाय यांचाही मागोवा घेणे अटळ ठरते. मराठीतल्या आरंभकाळातल्या साहित्याला विविध उपासना पंथांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यातला अत्यंत महत्त्वाचा पंथ म्हणजे नाथपंथ होय. नाथपंथ हा यादव साम्राज्यातला एक प्रभावी संप्रदाय होता. डॉ. जोगळेकर यांच्या मते, महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून प्रभावशाली ठरलेल्या महानुभाव, वारकरी आदी सर्व संप्रदायांचा मूलस्रोत नाथसंप्रदायच आहे आणि नंतरच्या संप्रदायांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नाथसंप्रदायाचीच तत्त्वे अंगिकारली आहेत असे दिसून येते. रा.चिं.ढेरे यांच्या मते, नाथसंप्रदायाची प्रथम लीलास्थली आहे. (जोगळेकर, १९८४ : १७४)
यादवकाळात साम्राज्यविस्तार झालेला होता, मंदिरे बांधली जात होती, दाने दिली जात होती. व्रतवैकल्ये यांना महत्त्व दिले जात होते, परंतु एकंदरीत समाजव्यवस्थेचा ताणाबाणा पाहिला तर सामान्यजन आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक स्तरांवर अभावांनी ग्रस्त होते असेच म्हटले पाहिजे. राजवटीच्या आश्रयाने समाजातला एक विशिष्ट स्तर फोफावत जातो आणि बाकीचा समाज समृद्धीच्या फळांपासून वंचित राहतो. यादवकाळातल्या संस्कृत साहित्याचा सामान्य जनतेशी काहीही संबंध राहिलेला नव्हता. पंडित आणि राजाच्या दरबारासाठीच ते लोक लिहित होते. संस्कृतमध्ये साहित्य विपुल लिहिले गेले पण त्यात मौलिकता, चैतन्य आणि प्रेरकतेचा अभाव होता.
ज्योतिषरत्नमाला
‘श्रीपति भट्ट’ याने १०३९ च्या सुमारास मूळ संस्कृतात हा ग्रंथ रचला व त्यावर संस्कृतात व मराठीत टीकाही लिहिली. मराठीत उपलब्ध असलेली ही टीका अपूर्ण आहे. या ग्रंथाची एकूण ७४ पृष्ठे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांना सापडली व तीही मूळ मराठी पोथी नसून त्यांच्या मते, १४४७ च्या सुमारास केव्हा तरी केलेली तिचा नक्कल आहे. ही पोथी राजवाडे यांनी १९९४ साली ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या वार्षिक इतिवृत्तांत छापून प्रसिद्ध केली.
‘तेया ईश्वररूपा कालाते मि
ग्रंथकर्ता श्रीपति नमस्कारी ।।’
अशी सुरुवात करून प्रस्तृत ग्रंथात श्रीपतीने युगे, संवत्सरे, त्यांचे स्वामी, ऋतू, मास, राशी, तिथी, महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व व त्या दिवशी करावयाची कर्तव्ये, शुभाशुभ योग इत्यादींची चर्चा केली आहे. मराठीतल्या हा या प्रकारचा पहिलाच ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच. परंतु राजवाडे यांच्या मते, या ग्रंथांतील भाषेचे स्वरूप पाहता तो ‘मराठीतील आद्य ग्रंथ’ आहे. राजवाडे यांच्या या मताशी इतर वाङ्मयेतिहासकार व संशोधक सहमत नाहीत.
लीळाचरित्र
महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल १२८३ च्या आसपास.
लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून १५०० पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या.
चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत.
लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात.
विवेकसिंधु
मुकुंदराजाने हा ग्रंथ १३६५ च्या सुमारास लिहिला. प्रा.कृ.पां.कुळकर्णी आणि वि.ल.भावे या ग्रंथाला मराठीतील आद्य ग्रंथ मानतात. हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पूर्वीचा असे त्यांचे मत होते. नवीन संशोधन हा ग्रंथ १३६५ च्या सुमारास लिहिला असे मानते.
विवेकसिंधु हा ग्रंथ उपनिषदांच्या मंथनातून तयार झालेला, शांकर अद्वैत मताचे प्रतिपादन करणारा आहे. विशेषतः ‘योगवासिष्ठ’ या ग्रंथाचा प्रभाव या ग्रंथावर आढळतो. मायावादाचे सूत्रबद्ध विवेचन या ग्रंथात केले आहे.
विवेकसिंधुत पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून एकूण १८ प्रकरणे आहेत. १६८४ पर्यंत ओवी संख्या आहे. गुरु-शिष्यसंवाद रूपाने येथे ब्रह्मज्ञान सांगितले आहे. शास्रीय विषयाचे यात निरूपण आले आहे. पहिल्या भागात सृष्टीची उभारणी, दुसऱ्या भागात सृष्टीचा संहार आणि जीव, प्रपंच, परमेश्वर, जीव मुक्ती यांचे विवेचन केले आहे. ‘ग्रंथीचे हेंचि चातुर्य । जे रोकडे स्वानुभव सौंदर्य । म्हणौनि सेवीतु मुनिवर्य । विवेकसिंधु हा ।।’ असे भाषासौष्ठव असणारा हा ग्रंथ रचनादृष्ट्या सुंदर आहे. त्यात लेखकाची बहुश्रुतता दिसते. प्रतिभासृष्टी संपन्न व समृद्ध आहे. कल्पनाविलास व विविध अलंकाराची योजना त्यात आहे. मराठीचा गौरव
‘धुळी आंतील रत्न । जरि भेटे न करिता प्रेत्न ।
तरी चतुरी येत्न । का न करावा ।’
या शब्दांत केला आहे. ‘ मराठी भाषेतल्या वेषातला शांकरमठातला सुबोध वेदान्त पाठ ’ म्हणजे विवेकसिंधु असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांनी म्हटले आहे.
संदर्भः संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश - खंड १
संपादकः जया दडकर, प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, सदानंद भटकळ

Tuesday, 24 February 2015

मराठीला अभिजात दर्जा

मराठीला अभिजात दर्जा भेटल्याने त्याचा काय फायदा होणार आहे ? नक्की कोणत्या मराठीला अभिजात दर्जा भेटणार आहे ? ह्या आणि ह्या सारख्या प्रश्नांची तीव्रता वाढायला लागली आहे .
याबाबतीत तरी आपल्याला खेकड्याच्या वृत्तीतून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे . नाही ते फाटे फोडून प्रश्न उपस्थिती करण्यापेक्षा , काही लोकांनी केलेल्या प्रयत्नाने सर्वांच्या पदरी जे चांगले पडतेय ते लगेच स्वीकारून त्याचा येत्या काळात फायदा कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केले तर होणारा लाभ अधिक होईल. निष्कारण नवीन नवीन वाद निर्माण करून लोकांच्या मनात संदेह उत्पन्न करून निराशा पसरवायची आणि जे अगोदरच आतून विरुद्ध आहेत त्यांना पाठबळ द्यायचे हे उद्योग आणि वृत्ती बंद करण्याची आवश्यकता आहे .
(मराठी ही संस्कृत पेक्षा जुनी आहे,असावी ह्याचे पुरावे सबळ होत असून त्यामुळेच काहींच्या पोटात दुखू तर लागले नाही ना अशी शंका येतेय )
ज्यांचे प्रश्न भाबडेपणातून किंवा अज्ञानातून आलेले आहेत त्यांच्यासाठी खाली काही ठळक बाबी
______________________________________________________
‘अभिजात’ शिक्कामोर्तबानंतर..
(केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्याने काय फायदे होतील?)
> मराठी श्रेष्ठ राष्ट्रीय भाषा असल्यावर शिक्कामोर्तब.
> मराठीची जागतिक प्रतिष्ठा उंचावेल.
> मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारकडून राज्याला दरवर्षी किमान १00 ते ५00 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मिळेल.
> मराठीचा अभ्यास आणि या भाषेतील संशोधनाकरता मराठी अध्यासन स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून भरीव निधी उपलब्ध होऊ शकेल. असा दर्जा मिळवणारी मराठी ही तामीळ, संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळमनंतरची सहावी भारतीय भाषा असेल.
मराठी संस्कृतपेक्षाही जुनी?
मराठी ही संस्कृतोद्भव भाषा नाही. ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे हे १८८५ मध्ये राजारामशास्त्री भागवत यांनी दाखवून दिले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर, ल. रा. पांगारकर, शं. गो. तुळपुळे, अन फेल्डहाऊस, वि. भि. कोलते आदिंनी मराठीचे वय दीड हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे असंख्य पुरावे दिलेले आहेत. ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, विवेकसिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ आहेत असं आम्ही अडाणीपणाने सांगतो. एवढे श्रेष्ठ ग्रंथ बालवयात कोणतीही भाषा कशी प्रसवू शकतील? गाथा सप्तसती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे.
(प्रा. डॉ. हरी नरके यांच्या ब्लॉगवरून घेतलेली संपादित माहिती.)
__________________________________________________
मराठी संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांना आता कोणी प्रांतीक संकुचितपणा म्हणणार नाही कारण मराठी संवर्धन करणे आता महाराष्ट्र शासना बरोबर केंद्र शासनालाही बंधनकारक राहील . मराठी भाषाने कोणत्याही इतर भाषेतून जन्म घेतला नसून ती संस्करीत नाही ह्यावर पण शिक्कामोर्तब होईल .
शिवाय येत्या काळात आपण ह्या अभिजात दर्जाचा फायदा मराठीसाठी कसा जास्तीत जास्त करून घेऊ हे आपल्यावर राहील. सरकारची इच्छा असो वा नसो मराठी आवडणार्यांनी याचा योग्य लाभ उठवला तर फायदा निश्चितच होईल 

Tuesday, 6 January 2015


" मी "                                                                                                                                                        

         " मी " या एका शब्दाभोवती अवघा संसार फिरतो असे मला लहान पणा पासून वाटे. वडिलांना " मी " या शब्दाचा तिटकारा फार. ते नेहमी हेच सांगत आले कि " मी " बोलू नये. पण " मी " या शब्दाभोवतीची वलय माझ्या भोवती नेहमीच राहिले. वडिलांनी सांगितलेला गर्भार्थ मी घेतला आणि शब्दश : अर्थ टाळला. 

            हळू हळू आई वडील यान बरोबरच्या जगाची व्याप्ती वाढत गेली. भावू , बहिण , मित्र , शिक्षक असंख्य नवीन नाती बनत गेली. प्रत्येकाच्या सुरुवातीची एक कारण होते. काही नात्यांबाबत ते कारण धुसर होत गेले आणि ती नाती अस्पष्ट होत गेली. आजवर कधी त्याचा कमीपणा भासला नाही. कारण काळ नेहमीच तुम्हाला पुढे ढकलत असतो.
        आई वडिलांच्या मायेखालाचे पाखरू हवेत भरारी मारू लागले आणि समाजाच्या असमानतेचे चटके अंगाला जाणवू लागले. जन्मतः जोडलेली नाती आई वडिलांनी जबरदस्ती , कधी गोड बोलून टिकवून घेतली आणि जगाशी नाते कसे टिकवावे हे सुचवून दिले. तिथे मी होतो पण त्या मी पानामध्ये सर्व होते. माझ्या त्या " मी " मुळेच ते सर्व होते आणि त्या " मी " साठीच हे सर्व घडत होते. फक्त हा " मी " वडिलांना तिटकारा असलेल्या " मी " पेक्षा वेगळा होता.
         मला नेहमीच हृदयाचे ऐकायला आवडते. ते नेहमी खरे बोलते. वयाच्या एका टप्प्यात प्रेमात पडलो आणि जोडलेल्या या नात्याने मला या अनोळखी जगाची एक प्रेमळ बाजू दाखवली. कोण कुठली ती येते आणि माझं सर्वस्व बनते. माझ्यासाठी ती तिचे जे सर्व होते ते सोडून जे माझे होते ते तिचे मानते आणि मला जगाचा एक नवीन चेहेरा दिला. हेच तेच अनोळखी आणि असमान जग होते ज्याने मला माझ्या आयुष्याचे नाते दिले. आता माझा या जगातला खरा प्रवास सुरु झाला आहे जिथे मला अजून अशी नाती हवी आहेत जी माझी आहेत.
        या प्रवासाच्या सुरुवातीच्याच टप्प्यात जाणवले कि मी एकटा नाही या प्रवासात ज्यांचा अंतिम पल्ला माझा आहे तोच आहे. हे सर्व मीच आहेत जे मी शोधत आहेत तेच शोधात आहे. या अनोळखी जगात आपले कोणी, स्वतःच्या बनवलेली आणि जोपासलेली ती प्रेमळ नाती, एकमेकांसाठी आपलेसी वाटणारी ती प्रेमळ मने, आम्ही एकमेकानांच शोधत होतो पण एकमेकांपासून दुरावले होतो.
                             
        जीवन फार सुंदर आहे. ते अधिक सुंदर करण्यासाठी जगावे. अधिक मोठ्या स्वरूपात जगावे आणि आपले जीवन  सुंदर करताना एक दिवस सर्वांचे जीवन सुंदर करावे. जोवर मी माझ्या " मी " चा शोध घेत नव्हतो तोवर मी सर्वांसोबत असूनसुद्धा एकटा  होतो. जेव्हा वडिलांचा " मी " समजलो तेव्हा सर्वांमधील " मी " अनुभवलो. आजवरच मी आता सर्वांचा " मी " झालो आणि माझ्या सर्वांचा मिळून बनली , " माझी मानसं "
" माझी मानसं " जी माझी आहेत. आणि हाच " मी " या प्रत्येक कुटुंबाचा " मी " आहे.