Sunday, 24 July 2016

उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – कुरवंडे – चावणी – उबरखिंड – खोपोली)



उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – उंबरखिंड – खोपोली)  


कोणत्याही नवीन मोहिमेची सुरवात हि अभ्यास मोहिमेतून करणे अनिवार्य असते . याच अनुषगाने उबरखिंड मोहीम साक्षात शिवराय ज्या मार्गांनी उबरखिंडीत दाखल झाले त्याच वाटेने करण्याचे योजले होते . त्यासाठी लोणावळा – कुरवंडे – चावणी – उबरखिंड – खोपोली ह्या मार्गाने मोहीम सुरु केली.  ठरल्याप्रमाणे दिनेश सावंत , अचल राणे , संतोष शेळके , विनोद भोसले , आणि योगेश वाळूंज असे आम्ही पाच जण या अभ्यास मोहिमे साठी प्रथमता जाणार होतो . त्यासाठी दिवस निवडला तो रविवार २४ जुलै २०१६. त्यासाठी आम्ही   शनिवार , २३ जुलै २०१६ रोजी सी.ए.टी  ते  पंढरपूर या पेसेंजर गाडीने लोणावळा पर्यंत चा प्रवास करणार होतो. सर्व नियोजन झाले होते, बैठक पार पडली होती . परतू संध्याकाळी त्यात अचानकपणे काही कारणाने ठरलेल्या मोहीम कार्यक्रमात बदल करून आम्ही सर्व रविवारच्या सकाळी ६:३३ च्या इंद्रायणी एस्प्रेस ने निघणार होतो.
               विनोद , संतोष , आणि मी (योगेश) आम्ही तिघेही अगदी वेळेवर ठरलेली गाडी पकडली. परंतु उर्वरित आमचे सख्खे दोन 
आधारस्तंभ म्हणजे दिनेश सावंत आणि आमच्या नेहमीच्या मोहिमेचे सरसेनापती अचल राणे यांचा काहीच पत्ता लागत नव्हता.
 दोघांना फोन करून करून आमच्या मोबाईल ची बॅटरी मात्र उतरली . पण एकाने मोबाईल बंद तर दुसर्याने तो बहुधा शांत मोड वर 
टाकून ठेवलेला असावा . असो ...  
आम्ही सारे एकमेकांचे सख्खे मित्रच , आमच्या तिघांचा हि मूड अचानक पणे आलेल्या या प्रसंगाने जाम उतरला होता. इंद्रायणी गाडी सोडून दिली . परतू काही केल्या या दोघांशी तिळमात्र हि संपर्क काही होऊ शकला नाही. आता करायचे काय? 
असा यक्ष प्रश्न आम्हां तिघांपुढे होता. सर्व नियोजित मोहिमेचा पुरता बोजबारा उडाला होता. आम्ही सर्वांचे आगाऊ तिकीट काढून ठेवले होते ते सुद्धा व्यर्थ गेले .काहीश्या गोंधळलेल्या आणि अचानक उद्भवलेल्या या 
परिस्थितीतून स्वतःला सावरत आम्ही कल्याण स्थानकात थोडी न्याहारी केली , आणि ओळखीच्या चेहऱ्यानसोबत थोड्या हसण्याचे
 क्षण अनुभवले . आमच्यातल्या विनोद ने मात्र आमच्या होणाऱ्या वाहिनीशी मनमोकळ्या गप्पा मात्र मारून घेतल्या. फसलेल्या नियोजनाचे अपडेट
सर्वांआधी “सबसे तेज” आमच्या वाहिनीन पर्यत पोहचत होते.   या सर्वातून उरलेले आम्ही दोघे २ तास मात्र ताटकळत राहिलो... 
असो!
पुढे काय करायचे ? कारण मिळणारी एक छानशी सुट्टी ची पुरती वाट लागलेली होतीच. अश्याच परिस्थितीत कार्ल्याच्या एकविरा 
आई , किवा भिवपुरी ला जाण्याच्या आम्ही विचार करू लागलो. सर्व काही ऑफ शेडूल होणार होते. असाच विचार करत करत 
आम्ही गर्दीने भरलेली आणि विकेंड ची मज्जा अनुभवण्यासाठी वा फिरण्यासाठी निघालेल्या मुंबई करांच्यासमवेत आम्ही हि 
कर्जत लोकल पकडली . त्याच गर्दीच्या लोकल मध्ये “दि शो मस्ट गो ओंन” या वाक्याला स्मरून उंबरखिंड ची ठरलेली मोहीमच 
“ऑफ शेडूल” करायची हे नक्की केले. कर्जत स्थानकातून आम्ही पुढे ९ वा. २०मि. ची इंदोर- पुणे या पूर्ण विनागर्दीच्या
गाडीने प्रवास करून लोणावळा स्थानकात १०वा. ११मि. दाखल झालो.  
 
      
लोणावळा स्थानकामधून बाहेर पडल्यानंतर बाहेर रिक्षा करून १५० रु . एवढा खर्च करून तिघांना कुरवंडे गावात जाता येते. चालत जायचे
असेल तर किमान ४५ मिनिटे ते १ तास लागतो. आम्हांला आधीच २ तास उशीर झाल्यामुळे १०वा. ४०मि. नी रिक्षाने प्रवास चालू केला.
रिक्षाने कुरवंडे गावात पोहचलो. तिथे थोडी चौकशी करून आम्ही कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागच्या बाजूने 
नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात केली.






 सर्वजण चालण्याच्या उत्साहात होते. उजवीकडे चढत जाणारी वाट साधारण २० मिनिटे चाललो काही अंतर चालत गेल्यावर आम्हांला 
INS SHIVAJI च्या लांबलचक कुंपण दिसले. थोड्या पुढे गेल्यावर जेथे नागफणी चा डोंगर आहे. एकाशेजारी एक असणारे 
तीन फलक  पाहिले.  


इथून उजवीकडे वर जाणारा रस्ता नागफणीला जातो तर डावीकडे उतरणारा कच्चा रस्त्याने अम्बा नदीच्या काठी
 असलेल्या चावणी गावात जाता येते.  
 आम्ही चालण्यास सुरवात केली . खूप सारी नोंद घेत घेत ,छायाचित्रे काढत काढत आमची मोहीम पुढे सरकत होती. झरा लागल्यानंतर
 मात्र एक वाट सरळ जात होती तर एक वाट उजवीकडेवळत होती. थोडा विचार करून आम्ही  उजवीकडच्या वाटेवर शिक्कामोर्तब केले. 
सर्वांनी उजवीकडे मोर्चा वळवला. तेथून लांबवर दरीत अम्बा नदीचे पात्र दिसू लागले .



एका ठिकाणी थांबून आमच्या सोबत आणलेल्या न्याहारी चा मोकळ्या रान परिसरात आम्ही आस्वाद घेतला. खडकातून वाहणाऱ्या डोंगराळ पावसाच्या पाण्याने आमची तहान भागवत तृप्त होऊन आम्ही पुढे चालत होतो.  सोबत संतोष ने आणलेल्या वाळवलेल्या आंब्याच्या कोयींचे, जांभळाच्या बियांचे रोपण “योग्य ठिकाणी” करत होतो.









मजल दरमजल करत आणि सेल्फिं घेण्याचा  मर्यादित आनंद घेत आम्ही खाली उतरत होतो. साधारणता २:०० ते २:३० तासाचे अंतर आम्ही चालुन पायथ्याशी असलेल्या चावणी गावात पोहचलो. गाव तसे अगदी साधारण आहे . किमान २०० घरांची वस्ती असलेला ते एक छोटेसे गाव होते. त्या गावातून काही कच्चा आणि मग डांबरी रस्त्यातून चालत आम्ही “उंबरखिंडीत” दाखल झालो.












































समरभूमीत आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महाराजांच्या पराक्रमाला स्मरून तिथे उभारलेल्या स्मारकाला वंदन करून आम्ही दुपारचे जेवण घेतले. थोडा वेळ पोहण्याचा आनंद आम्ही त्या ओढ्या च्या ठिकाणी घेतला. वेळेचा भान ठेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. उबरखिंड ते पाली-खोपोली रोड असे ४ किलोमीटर अंतर आम्ही पायी कापले. रोडवर आल्यावर ट्रक ने आम्ही काही अंतरावरील मुख्य चौकात उतरलो तेथून पाठून आलेल्या पाली-खोपोली एस.टी.  गाडीने आम्ही खोपोली गाठले .
मोहीम करताना सर्वांचा विचार, तसेच योग्य निर्णय घेण्याची असलेली नितांत गरज आणि आमच्यातील मोहीम सुरु असतानाची अबाधित एकत्र विचार शक्ती शेवटपर्यंत कायम ठेवायची असते. तिला कोणत्याही परिस्थितीत फाटे फुटू देता कामा नये. याची जाणीव करून देत , काहीश्या काळजीने आमची हि ऑफ शेडूल मोहीम मजेशीररित्या यशस्वीपणे संपन्न जाहली!  
  

मोहीम सूत्र - 

१. लोणावळा स्टेशन परिसरापासून मोहीम सुरवात  

२.  लोणावळा ते कुरवंडे गावापर्यंत प्रवासाचे नियोजन करावे .

. कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठच्या बाजूपासून नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात करावी.  

. च्या कुंपणाच्या बाजूने सरळ चालत जावे. 

. चावणी गावाच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात करावी. 

. चावणी गावातून पुढे उंबरखिंडित जाता येते. 

. परतीच्या प्रवासाच्या वेळी ४ किलोमीटर अंतर चालत पार करून शेमडी गावच्या ठिकाणी, पाली – खोपोली रोड पर्यत पोहोचणे.
८. तेथून एस. टी . बस ने किवां खाजगी वाहनाने खोपोली ला जाता येते .